तुरुंगात जाण्याची इच्छा कोणाची असणार..? मात्र प्रत्येकालाच तुरुंगाबद्दल, तेथील वातावरणाबद्दल एक वेगळं कुतूहल असते. म्हणजे कैद्यांचे जनजीवन कसे असेल, त्यांची दिनचर्या कशी असेल, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता असते.
तुम्हालाही अशीच जिज्ञासा असेल, तर तुम्हाला एक दिवस अट्टल आरोपींसोबत घालविता येणार आहे. अर्थात त्यासाठी तुम्हाला पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. पैसे खर्चून तुरुंगवारी करता येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने 26 जानेवारी 2021 पासून तुरुंग पर्यटन योजना सुरु केली होती. त्यानंतर आता बेळगावमधील हिंडलगा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने ‘तुरुंग पर्यटन’ ही संकल्पना मांडली आहे. सरकारची परवानगी मिळाल्यावर ही योजना सुरु केली जाणार आहे.
कैद्यांचं जीवन कसं असतं, त्यांना कशाप्रकारे जगावं लागतं, त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी कशी केली जाते, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून त्यांच्याकडून कोणताही गुन्हा घडू नये, कोणतेही वाईट कृत्य करण्यासाठी ते धजावू नयेत, यासाठी तुरुंग पर्यटन संकल्पना मांडली आहे.
किती पैसे लागणार..?
मृत्युदंड ठोठावलेले कैदी, कुख्यात तस्कर वीरप्पनचे साथीदार, दांडूपाल्या गँगमधले काही गुंड, सीरियल किलर उमेश रेड्डी याच्यासह 29 कैद्यांना या सहलीत पर्यटकांना पाहता येणार आहेत. ‘कैद्याच्या आयुष्यातला एक दिवस’ असे या संकल्पनेचे नाव आहे. त्यासाठी 24 तासांसाठी 500 रुपये मोजावे लागणार आहेत.
कैद्यांप्रमाणेच पर्यटकांना वागविणार..
हिंडलगा तुरुंगाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, येथे येणाऱ्या पर्यटकांना कैद्यांप्रमाणेच वागवलं जाणार आहे. त्यांची दिनचर्या अगदी कैद्यांप्रमाणेच असेल. तुरुंगातले सुरक्षारक्षक पहाटे पाच वाजता अन्य कैद्यांबरोबरच या पर्यटकांनाही उठवतील.
सकाळी त्यांना चहा देण्यात येईल; मात्र त्याआधीच कैद्यांप्रमाणे त्यांना त्यांची सेल स्वच्छ करावी लागेल. नंतर तासभराने त्यांना नाश्ता दिला जाईल. सकाळी 11 वाजता भात-सांबरचे जेवण दिले जाईल. नंतर रात्रीचे जेवण थेट सायंकाळी सात वाजता असेल.
आठवड्यातून एक-दोनदा नॉन-व्हेज जेवणही दिलं जाईल. विकेंड्सला विशेष खाद्यपदार्थही दिले जातील. पर्यटकांनाही कैद्यांप्रमाणेच कपडे दिले जातील. त्यांना कैदी नंबरही दिला जाईल. परिसराची स्वच्छता, बागकाम, जेवण बनविण्याचे काम कैद्यांसोबत करावे लागणार आहे.
रात्री कैद्यांप्रमाणेच पर्यटकांनाही जमिनीवर चटईवरच झोपावं लागेल. त्यांना कैदी असल्याचा फील यावा, यासाठी त्यांच्या सेलला बाहेरून कुलूपही घातलं जाऊ शकतं, अशी माहिती देण्यात आली.