नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र त्यात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी भाजप नेते भागवत कराड यांना अर्थ राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. त्यामुले मुंडे समर्थक नाराज झालेले आहे. त्याचाच प्रत्यय केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेत आज (ता. 16) पाहायला मिळाला.
जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्रीय मंत्री कराड यांनी आजपासून जनआशीर्वाद यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्याची सुरुवात परळीतील गोपीथनाथ गडावरुन करण्यात येणार होती.
त्यानुसार भागवत कराड आज सकाळी साडे नऊच्या सुमारास परळीतील पंकजा मुंडे यांच्या घरी आले. पंकजा यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, केंद्रात पंकजा यांच्या भगिनी डाॅ. प्रीतम यांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या मुंडे समर्थकांनी कराड यांच्यासमोरच पंकजा यांच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी केली.
गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत होते. दरम्यान, भागवत कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात केली. त्यांच्यासोबत पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.
पंकजा यांच्या घराबाहेर समर्थकांनी पंकजा आणि प्रीतम यांच्या नावाने घोषणाबाजी सुरु केली. ‘पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है..’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. त्यानंतर कराड यांच्यासमोरच राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा चांगल्याच भडकल्या. त्यांनी तेथेच कार्यकर्त्यांना झापलं.
काय अंगार-भंगार घोषणा लावलीय?
“मी शिकवलं आहे का, तुम्हाला असं वागायला..? ‘मुंडे साहेब अमर रहे..’ ही घोषणा आम्ही रोखू शकत नाही. पण, ही काय अंगार-भंगार घोषणा लावलीय? दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम चालू आहे का? जेवढ्या उंचीची मी आहे, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची.. नाहीतर मला भेटायला यायचं नाही..” अशा शब्दांत पंकजा यांनी कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली.
केंद्रीय मंत्री कराड यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ते २१ ऑगस्टदरम्यान ही जनसंवाद यात्रा काढली आहे. ‘मुंडे साहेबांचे आशिर्वाद आणि जनतेचा पाठिंब्यामुळेच आज इथवर पोचलो. आता जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी येत असल्याचे कराड यांनी ट्विट केले आहे.