सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लाॅर्डसवर सुरु असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. भारताच्या 364 धावांना उत्तर देताना इंग्लंडनेही कॅप्टन ज्याे रुटच्या दमदार शतकाच्या 391 धावा करीत जोरदार फाईट दिली.
दरम्यान, लाॅर्डसवर कसोटी रंगलेली असताना, आज सकाळी एक धक्कादायक बातमी समाेर आली. त्यामुळे भारताचे क्रिकेट फॅन तर एकदम अवाक् झाले. ही बातमी होती, कॅप्टन विराट कोहली याने निवृत्ती जाहीर केल्याची..! ही बातमी खरी होती की कोणी अफवा पसरवली, याबाबतच्या चर्चांना उधान आले.
गेल्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी भारताचा सर्वाधिक यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याने कोणतीही पूर्वसूचना न देता, सोशल मीडियातून अचानक निवृत्ती जाहीर केली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन त्याला आज (15 ऑगस्ट) एक वर्ष पूर्ण झाले. धोनीनं वर्षभरापूर्वी 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे माहीच्या क्रिकेट फॅन्सना धक्का बसला होता.
आजची सकाळ क्रिकेट फॅन्सला धक्का देतच उजाडली. कारण टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याच्याबाबत एक ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं..
धोनीने गेल्या वर्षी ज्या पद्धतीने निवृत्ती घेतल्याचं जाहीर केले होते, तसेच विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केल्याचे व्हायरल झालेल्या या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली.
महेंद्रसिंग धोनीने गेल्या वर्षी १५ ऑगस्टलाच निवृत्ती जाहीर केली होती. त्याला ट्रिब्यूट देण्यासाठी म्हणून विराट कोहलीनेही निवृत्ती जाहीर केल्याचे या ट्विटमध्ये म्हटले होते. सुरवातीला अनेकांना हे ट्विट खरे वाटले. मात्र, नंतर हे ट्विट फेक असल्याचे समोर आले.
सध्या विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर आहे. मात्र, गेल्या काही काळापासून तो खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याच्यावर सातत्याने टीका होत आहे.
धोनीच्या निवृत्तीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त साधून ट्रोलर्सनी विराटला लक्ष्य केलं. त्यासाठीच हे फेक ट्विट व्हायरल केल्याचे समोर आले आहे.