दिवस होता, ११ नोव्हेंबर २०१८.. पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधींचे उल्लंघन करीत केलेल्या गोळीबारात नाशिकमधील जवानास वीरमरण आले; पण त्यामुळे या जवानाची पत्नी खचली नाही. डगमगली नाही. आता या वीरपत्नीला सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची आहे, पतीच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे.
यशोदा गोसावी, असे या वीरपत्नीचे नाव आहे. सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी गावचे वीर सुपूत्र हुतात्मा केशव गोसावी यांची वीरपत्नी यशोदा यांची ही कहाणी…
‘इंडियन आयडाॅल’ कार्यक्रमात नुकतीच यशोदा यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी आपले पती शहीद केशव यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या दिवसाची आठवण सांगताना, यशोदा भावूक झाल्या होत्या.
त्या म्हणाल्या, की पाकिस्तानी लष्कराने शस्रसंधी मोडून 11 नोव्हेंबर 2018 साली भारतीय सैनिकांवर बंदुकीतून गोळ्यांचा तुफान वर्षाव केला. त्यात पती केशव यांनी वीरमरण आले.
देशासाठी ज्या दिवशी शहीद केशव यांनी दुश्मनाच्या गोळ्या अंगावर झेलल्या, त्या दिवशी काही तास आधीच यशोदा आणि केशव यांच्यात फोनवर बोलणे झाले होते. यशोदा त्यावेळी ९ महिन्यांच्या गर्भवती होत्या. लवकरच त्याच्या घरात नवा पाहुणा येणार होता. घरात आनंदीआनंद होता.
केशव यांनी फोनवर त्यांना लाडू बनविण्यास सांगितले होते. ९ महिन्यांची गर्भवती असतानाही यशोदा यांनी कसेबसे लाडू तयार केले. त्या दिवशी सायंकाळी केशव यांच्या यूनिटमधून फोन आला. समोरच्या व्यक्तीने यशोदा यांना शेजारी कुणी असेल, तर त्यांच्याकडे फोन देण्यास सांगितले.
यशोदा यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. समोरून फोनवर केशव यांना वीरमरण आल्याचे सांगण्यात आले. बातमी ऐकून यशोदा यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. सुरवातीला तर त्यांना या बातमीवर विश्वासच बसत नव्हता, पण सत्य बदलणार नव्हते.
पती केशव यांच्या निधनानंतर यशोदा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, पण त्या वीरपत्नी होत्या. त्या डगमगल्या नाहीत. धैर्याने उभ्या राहिल्या. केशव यांना वीरमरण आल्यानंतर अवघ्या 8 दिवसांनी त्यांच्या घरात चिमुकल्या पावलांनी कन्येचे आगमन झाले. त्यांनी ‘काव्या’ असे तिचे नामकरण केले.
आता त्यांची काव्या गोसावी दोन वर्षांची झालीय. एखाद्या सैनिकी कुटुंबातील स्त्रीला शोभेल, असा निर्णय त्यांनी घेतलाय. यशोदा यांना आता सैन्यात भरती व्हायचे आहे. केवळ सैन्यात भरतीच नाही, तर पतीवरील गोळीबाराचा बदला घेण्याचा त्यांचा दृढ निश्चय आहे. देशसेवा नि पतीवरील निस्सिम प्रेमामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.