स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींकडून विविध घोषणा, मुलींना सैनिकी शाळांमध्ये प्रवेश, जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभा निवडणूक कधी होणार..?
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध घोषणा केल्या. भारताचा 100 वा स्वातंत्र्यदिन साजरा होईल, तेव्हा देश पायाभूत सुविधा आणि अन्य सुविधांबाबत पुढारलेला असावा, अशी इच्छा व्यक्त केली.
देशातील दळवळण वेगवान करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘गतीशक्ती’ योजनेची घोषणा केली. त्यानुसार येत्या 75 आठवड्यांत रेल्वे विभागाकडून 75 ‘वंदे भारत ट्रेन’ सुरु करण्यात येतील. या ट्रेन्स भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन संपूर्ण देश जोडतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे
* उज्वला योजनेपासून आयुष्मान योजनांची ताकद सर्वसामान्यांना माहिती आहे. मात्र, आता 100 टक्के गावांमध्ये रस्ते असावेत, सर्वांचे बँक खाते असावेत, सर्वांकडे आयुष्मान कार्ड असावे, घरकुल योजनेतून प्रत्येकाला हक्काचं घर द्यायचं आहे.
*आयुष्मान भारत योजनेत नागरिकांना स्वस्त औषधं उपलब्ध करुन दिले जाते. आता ब्लॉक स्तरावर आधुनिक रुग्णालयं उभारण्यावर भर दिला आहे. यापुढे रुग्णालयांकडे स्वतःचे ऑक्सिजन प्लांट असतील.
* देशाला सहकारवादाचीही गरज आहे. सहकार हे एक संस्कार, प्रेरणा आणि सोबत चालण्याची वृत्ती आहे. म्हणूनच स्वतंत्र सहकार मंत्रालय बनविण्यात आले.
* देशात 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे जितकं लक्ष द्यायला हवं होतं, तितकं आधी दिलं गेलं नाही. आत्ता या शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
* ऊर्जा क्षेत्रासाठी मोठी घोषणा, ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’ राबविणार.
* मुलींनाही समान संधी मिळाली पाहिजे. मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. त्यामुळे आता देशातील सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश देणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली.
* जम्मू-काश्मीरमध्ये डिलिमिटेशन बोर्डाचं गठन झालंय, लवकरच तिथं विधानसभा निवडणुका होतील.
* देशातील 100 टक्के घरांमध्ये वीज पोहचली, 100 टक्के घरांमध्ये शौचालय निर्मितीसाठी प्रयत्न केले. आता प्रत्येक घरात पाण्याचा नळ देण्यासाठी काम करणार.
* देशाच्या फाळणीचा दिवस यापुढे दरवर्षी साजरा केला जाईल. या दिवशी फाळणीमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांची आठवण केली जाईल.
* ऑलिंम्पिकमध्ये देशाचं नाव रोषण करणाऱ्या खेळाडूंच्या सन्मानासाठी देशवासीयांना काही वेळ टाळ्या वाजवाव्यात.