पाक सैनिकाने मागितली माधुरी दीक्षित, ‘शेरशाह’ विक्रम बत्रांच्या उत्तराने वळली शत्रूची बोबडी, कारगिल युद्धातील अनोखा किस्सा..!
कारगिल युद्धाचे नायक शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारीत ‘शेरशाह’ चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफाॅर्मवर रिलिज झाला. त्याला चित्रपट रसिकांचा मोठा प्रतिसादही मिळत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी यांच्या त्यात प्रमुख भूमिका आहेत.
देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या विक्रम बत्रा यांच्या जीवनातील घटनांवर ‘शेरशाह’ चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. कारगिल युद्धादरम्यान विक्रम बत्रा यांचे अतूल्य धाडस, पराक्रम, शौर्याने पाकिस्तानी सैन्याला मोठी धडकी भरली होती.
कारगिल युद्धादरम्यान कॅप्टन विक्रम बत्रा हे त्यांच्या टीमसोबत ‘पॉईंट ४८७५’साठी लढत होते. विक्रम बत्रा व पाकिस्तानी सैनिकांत काही वेळ संभाषण झालं होतं. त्यावेळी एका पाकिस्तानी सैनिकाने अभिनेत्री माधुरी दीक्षितची मागणी केली होती. मात्र, त्याला विक्रम यांनी दिलेल्या उत्तराने त्या सैनिकाची बोबडीच वळली.
कॅप्टन विक्रम बत्रा यांचा भाऊ विशाल बत्रा यांनी २०१७ मध्ये एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. विशाल यांनी सांगितले होते, की शत्रू सैनिकाच्या बाजूलाच विक्रम होता. पाकिस्तानी सैनिक त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करीत होते.
‘अरे शेरशाह, वर आलास, तर तुझी वाईट वेळ आलीच समज…’ असा इशारावजा धमकी पाकिस्तानी सैनिकाने दिली. त्याचा विक्रम यांना फारच राग आला. त्यावर त्यांनी ‘पुढच्या 1 तासांत टेकडीवर कोण टिकतं, हे पाहू या..’ असे उत्तर दिले होते.
‘आम्ही तुम्हाला हरवू आणि तुमची प्रसिद्ध अभिनेत्री माधूरी दीक्षितला घेऊन जाऊ…’ असे पाकिस्तानी सैनिक म्हणाला. त्यानंतर विक्रम यांनी टेकडीवर तिरंगा फडकावण्याआधी तिथे अगदी शांतपणे ग्रेनेड बॉम्ब फेकला नि ‘तुम्हा सर्वांना माधुरी दीक्षितकडून लहानशी भेट…’ असे उत्तर दिले.
दरम्यान, काही वेळातच पाकिस्तानी सैनिकांच्या बखरी बरखास्त करून कॅप्टन विक्रम बत्रा यांनी तेथे भारताचा तिरंगा फडकावला होता. विक्रम बत्रा यांच्या अतुलनिय शौर्याने पाकिस्तानी सैनिकांची बोलतीच बंद झाली..