भारतातच नव्हे, तर ‘या’ पाच देशांतही होणार स्वातंत्र्यदिन साजरा, 15 ऑगस्टलाच झाली त्यांचीही गुलामगिरीतून सुटका..!
ब्रिटीशांच्या जुलुमी राजवटीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. हा स्वातंत्रदिन आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. स्वातंत्र्यलढ्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, त्यांचे स्मरण करतो. त्यांना वंदन करतो. भारतीयांच्या नसानसात आपला स्वातंत्र्यदिन भिनला आहे.
यंदा भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन उद्या (रविवारी) साजरा करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन सर्वत्र हा दिन साजरा केला जाणार आहे. भारतीय देशप्रेमात आकंठ बुडणार आहेत. मात्र, उद्या (रविवारी) भारतातच नव्हे, तर जगातील आणखी 5 देशांमध्येही देशप्रेमाचे भरते येणार आहे.
भारतासह जगातील आणखी 5 देशांचीही 15 ऑगस्ट या दिवशी गुलामगिरातून सुटका झाली होती. त्यामुळे हे 5 देशही उद्या (रविवारी) आपला स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत.
दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, कांगो, बहरीन आणि लिक्टेस्टाइन हे देशही 15 ऑगस्टला स्वतंत्र झाले होते. या देशांवर कोणी राज्य केले? त्यांची या गुलामगिरीतून कधी सुटका झाली? काय आहे त्यांच्या स्वातंत्र्याची कहाणी? याचा घेतलेला मागोवा..
दक्षिण व उत्तर कोरियाची मुक्तता
दक्षिण व उत्तर कोरियावर जपानची सत्ता होती. मात्र, यूएस आणि सोव्हिएत फौजांनी 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानपासून दक्षिण कोरियाची मुक्तता केली. त्यामुळे याच दिवशी दक्षिण कोरिया आपला राष्ट्रीय दिन साजरा करतो. दक्षिण कोरियाप्रमाणेच उत्तर कोरियाही 15 ऑगस्ट 1945 रोजी मुक्त झाला.
बहरीन ब्रिटीशांपासून स्वतंत्र
बहरिन देशांवर ब्रिटिशांचे साम्राज्य होते. मात्र, 1960 च्या दशकापासून ब्रिटिश सैन्य बहरीन सोडून जाऊ लागले. अखेर 15 ऑगस्ट 1971 रोजी बहरीन ब्रिटीशांपासून स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला बहरीन आणि ब्रिटनमध्ये करार झाला. त्यानंतर बहरीने एक स्वतंत्र देश म्हणून ब्रिटनसोबत आपले संबंध कायम ठेवले.
बहरीनला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट रोजी मिळाले असले, तरी ते आपला राष्ट्रीय सण 16 डिसेंबर असल्याचे मानतात, कारण यादिवशी बहरीनचे शासक इसा बिन सलमान अल खलीफा यांनी गादी मिळविली होती.
फ्रान्सच्या राजवटीतून कांगो मुक्त
आफ्रिकेतील कांगो देश 15 ऑगस्ट 1960 रोजी फ्रान्सच्या राजवटीतून मुक्त झाला. त्यानंतर रिपब्लिक ऑफ कांगो तयार झाला. 1880 पासून कांगोवर फ्रान्सची राजवट होती. त्यावेळी फ्रेंच कांगो म्हणून ओळखलं जात होतं. नंतर 1903 मध्ये मिडिल कांगो झाला.
लिक्टेस्टाइनची जर्मनीपासून सुटका
जगातील सर्वात लहान देशांपैकी एक म्हणजे लिक्टेस्टाइन देश. या देशावर जर्मनीची सत्ता होती. मात्र, 15 ऑगस्ट 1866 रोजी हा देश जर्मनीपासून स्वातंत्र्य झाला. मात्र, त्यानंतर या देशाने 1940 सालापासून 15 ऑगस्ट ही दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.