श्रावणात महाराष्ट्रात सण-उत्सवाचे भरते आलेले असते. नुकताच नागपंचमी सण साजरा झाला. आता एकामागाेमाग सण येणार आहेत. ओणम, रक्षाबंधन, गणेश चतुर्थीसह नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दसरा, दिवाळी आणि ख्रिसमस सारखे मोठे सणोत्सव आहेत. या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असते.
कोरोनामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनेकांचे खिसे रिकामे झाले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक जण विचारपूर्वकच पैसे खर्च करीत आहे. सण-उत्सवातही अशीच आर्थिक मंदी राहू नये, लोकांना पैशांची अडचण न येता खरेदी करता यावी, यासाठी केंद्र सरकारने विशेष तयारी केलीय.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोणताही सण-उत्सव साजरा करण्यासाठी आता कर्मचाऱ्यांनी पैशांची चणचण भासणार नाही. अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना आगाऊ पगार आणि पेन्शन देणार असल्याचे मोदी सरकारने जाहीर केले आहे.
सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी त्यांना पगार आणि पेन्शन एडवान्स दिली जाणार आहे. केरळमधील केंद्रीय कर्मचाऱ्यांना 19 ऑगस्टला पगार एडव्हान्समध्ये देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
केरळमध्ये ओणम हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या ओणम सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा आगाऊ पगार दिला जात आहे. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, केरळनंतर महाराष्ट्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ दिला जाणार आहे.
महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव होत आहे. त्यानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. घराेघर गणेशांची प्राणप्रतिष्ठापणा होते. घर दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामुळे केरळमध्ये 19 ऑगस्टला, तर महाराष्ट्रात 19 सप्टेंबरला केंद्रीय कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा केंद्रीय पेन्शनधारकांनाही फायदा होणार आहे. सण-उत्सवात पेन्शनधारकांना पेन्शन देण्याच्या सूचना बँकांना करण्याबाबतचे निर्देश मोदी सरकारने रिझर्व्ह बँकेला दिले आहेत.