SpreadIt News | Digital Newspaper

इस्राेचे मिशन ‘जी सॅट-1’ फेल..! उपग्रह अवकाशात स्‍थापित करण्यात अपयश, कशामुळे आले अपयश..?

पहाटेची वेळ. कृत्रिम उपग्रहासह प्रक्षेपकाने (रॉकेटने) अवकाशात झेप घेतली. शास्रज्ञ डोळ्यांत तेल घालून या मोहिमेवर लक्ष ठेवून होते. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत चाललेली. मनात अपयशाची भीतीही होतीच. धास्तीने शास्रज्ञांच्या चेहरे घामाने डबडबले होते नि अखेर मनातील भीतीच खरी ठरली..

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात ‘इस्रो’ची उपग्रह प्रक्षेपण मोहीम आज (ता. 12) अयशस्वी ठरली. श्रीहरीकोटा येथून नियोजित वेळेनुसार आज पहाटे ५ वाजून ४३ मिनिटांनी ‘जीएसएलव्ही- एफ १०’ प्रक्षेपक (रॉकेट) ‘ईओएस-०३’ या कृत्रिम उपग्रहासह अवकाशात झेपावले.

Advertisement

साधारण नऊ मिनिटांत प्रक्षेपकाने पहिले दोन टप्पे यशस्वी पार पडले. सुमारे १३० किलोमीटरची उंची गाठल्यावर महत्त्वाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. उपग्रहाला आणखी उंच नेणाऱ्या ‘क्रायजेनिक इंजिन’मध्ये काहीतरी बिघाड झाला. अवघ्या काही सेकंदातच इंजिनसह उपग्रह नियोजित मार्ग भरकटला.

इस्रोच्या संकेतस्थळावरून व इस्रोच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून उपग्रह मोहिमेचे थेट प्रक्षेपण सुरू होते. श्रीहरिकोटामधील मिशन कंट्रोलमधून प्रत्येक सेकंदाला होणाऱ्या घडामोडीची माहिती दिली जात होती.

Advertisement

दरम्यान, मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात गडबड झाल्याचे समोर आल्यावर सगळ्यांच्या चेहरे चिंतातूर झाले. ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी नंतर 10 मिनिटांत मोहिमेचा आढावा घेऊन ती अपयशी झाल्याचे जाहीर केले.

Advertisement

‘जीएसएलव्ही- एमके २’ चे हे एकूण १४ वे उड्डाण होते. २००१ पासून सुरू झालेल्या ‘जीएसएलव्ही- एमके २’च्या प्रक्षेपणाच्या सुरुवातीच्या पाच मोहिमांमध्ये अपयश आले होते. त्यामुळे ‘इस्रो’च्या या ‘जीएसएलव्ही- एमके २’ला ‘नॉटी बॉय’ म्हणूनही ओळखले जात होते. मात्र, त्यानंतरच्या सलग सहा मोहिमा यशस्वी झाल्या. होत्या.

अवकाश तंत्रज्ञानात ‘क्रायजेनिक इंजिन’ अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान व चीन यांच्यानंतर फक्त भारताकडे हे तंत्रज्ञान आहे. मात्र, आजच्या मोहिमेत तिसऱ्या टप्प्यावर क्रायजेनिक इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ‘इस्रो’साठी हा मोठा धक्का आहे.

Advertisement

इस्त्रोचा हा तिसरा प्रयत्न अपयशी ठरला. यापूर्वी ५ मार्च २०२० रोजी उपग्रहाचे प्रक्षेपण होणार असतानाच २६ तास आधी ते रद्द करण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला व्होल्टेजसंदर्भातील अडचणीमुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलले होते.

उपग्रहाविषयी….

Advertisement
  • उपग्रहाचे मूळ नाव ‘जी सॅट-1’ असे आहे. त्याला ‘जिओ इमेजिंग उपग्रह’ असेही म्हटले जाते.
  • चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर या उपग्रहाद्वारे लक्ष ठेवता येणार आहे. त्यामुळेच या उपग्रहाला ‘आय इन दी स्काय’ असे म्हटले जाते.
  • पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 36 हजार किलोमीटर अंतरावर तो स्थिरावणार आहे.
  • या उपग्रहाद्वारे दिवसातून किमान चार ते पाच वेळा छायाचित्रे घेता येतील. हवामानाबाबतचा डेटा पाठविला जाईल.
  • या उपग्रहाचे वजन 2,268 किलो आहे.
  • पीक लागवड क्षेत्राबाबत माहिती घेणे, दुष्काळ-पूर परिस्थितीवर लक्ष ठेवणे, सागरी क्षेत्र व्यवस्थापन, वातावरणातील धुकं-धुळ याबद्दलची ताजी माहिती, आपात्कालीन व्यवस्थापनासाठी उपयोग होणार होता.