घोड्यापासून बनतेय कोरोनावरील रामबाण औषध, केवळ 72 तासांत रुग्ण ठणठणीत, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात शोध
कोरोनाविरोधात जगभर लढाई सुरु आहे. कोरोना विषाणू रोखण्यासाठी अनेक शास्रज्ञ रामबाण औषध शोधण्याच्या कामाला लागले आहेत. त्यात आता महाराष्ट्रातील, आपल्या कोल्हापुरातील एक कंपनीही कोरोनावर विजय मिळविण्यासाठी मैदानात उतरली आहे.
या कंपनीच्या दाव्यानुसार, घोड्यांच्या शरीरातील अँटीबॉडीजपासून तयार केलेलं औषध कोरोनावर अधिक प्रभावी ठरेल, या औषधामुळे अगदी ७२ तासांत कोरोना रुग्णाची आरटीपीसीआर (RT-PCR) चाचणी निगेटिव्ह येत असल्याचे सागंण्यात आले.
‘आयसेरा बायॉलॉजिकल’ (iSERA Biological) असे या कोल्हापूरातील कंपनीचे नाव आहे. चार वर्षांपूर्वीच ही कंपनी सुरू झाली. ही कंपनी सर्पदंश, श्वानदंश, डिप्थिरिया आदींवरच्या औषधांची निर्मिती करते. आता या कंपनीने घोड्यांमधील अँटीबॉडीजपासून कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त औषध विकसित केलं आहे.
‘आयसेरा बायॉलॉजिकल’ कंपनीच्या या औषधाच्या पहिल्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या सुरु आहेत. तीन टप्प्यांतल्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर या औषधाचा वापर प्रत्यक्ष रुग्णांवर करता येणार आहे. तसं झाल्यास कोरोनावरील हे पहिलंच स्वदेशी औषध ठरणार आहे.
‘आयसेरा बायोलॉजिकल’च्या दाव्यानुसार…
‘आयसेरा बायोलॉजिकल’चे संचालक (न्यू प्रॉडक्ट) नंदकुमार कदम म्हणाले, की ‘घोडा हा मोठा प्राणी असल्यामुळे, त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडीज तयार करू शकतात. त्यामुळे या औषधासाठी घोड्याची निवड करण्यात आली.’
कोणतीही लस दिल्यानंतर मानवी शरीरात जशा अँटीबॉडीज तयार होतात, तीच प्रक्रिया इथे वापरली. कोरोना विषाणूतील अँटीजन घोड्यांना टोचल्यामुळे त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या. उच्च गुणवत्तेची प्रक्रिया वापरून या अँटीबाॅंडीज शुद्ध करण्यात आल्या. कोविड-19ला त्या निष्प्रभ करणाऱ्या आहेत.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) या संस्थेने घोड्यांमध्ये टोचण्याकरिता योग्य अँटीजेनची निवड करण्यासाठी आम्हाला मदत केली. संसर्गग्रस्त शरीरात अँटीबॉडीज विकसित होण्यासाठी साह्यभूत ठरणाऱ्या रसायनाची निवड करण्यासाठीही त्या संस्थेने मदत केली,’ असंही कदम यांनी नमूद केलं.
सध्या पहिल्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या सुरू असून, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेण्यात येणार आहेत. सगळ्या चाचण्यांचे निष्कर्ष योग्य आल्यास वर्षाअखेरीस कंपनी हे औषध बाजारात आणू शकते. औषधाच्या एका इंजेक्शनची किंमत काही हजार रुपये असेल, असे सांगितले.
‘भारतासारख्या देशात कोरोनावर हे औषध महत्त्वपूर्ण ठरेल. बाजारात उपलब्ध असणाऱ्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या तुलनेत त्याची किंमत कमी असेल, अशी अपेक्षा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेचे माजी महासंचालक प्रा. एन. के. गांगुली यांनी व्यक्त केली.