SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शाळा सुरु करण्याच्या निर्णयास ब्रेक, हाॅटेल रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी, नाट्यगृहे-मंदिरांबाबत काय ठरले..?

महाराष्ट्रातील जनतेसाठी आज (ता. 11) दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत. त्यातील पहिली बातमी म्हणजे, शाळा-महाविद्यालये सुरु करण्याच्या निर्णयावरुन राज्य सरकारने अवघ्या 24 तासांत ‘यू-टर्न’ घेतला आहे.

राज्यातील हाॅटेल व्यावसायिकांना दिलासा देणारी दुसरी बातमी आहे. राज्य सरकारने कमी आसन क्षमतेसह रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, राज्यातील माॅल्स, नाट्यगृहे सुरु करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय झाला, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

राज्यातील ग्रामीण भागातील 5 वी ते 8 वी आणि शहरी भागातील 8 वी ते 12 वीपर्यंतच्या शाळा-महाविद्यालये 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, अवघ्या 24 तासांत राज्य सरकारला आपल्या निर्णयावरुन मागे फिरावे लागले आहे.

आता कधी सुरु होणार शाळा..?
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, की “शाळा-कॉलेज सुरु करण्यास टास्क फोर्स, पिडीयाट्रीक टास्क फोर्स, तसेच पहिल्या कोरोनाच्या लाटेपासून असलेला टास्क फोर्स, यांनी विरोध दर्शविला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत टास्क फोर्स आणि शिक्षण अधिकाऱ्यांची पुन्हा बैठक होणार आहे. त्यात अंतिम निर्णय होईल. त्यानुसार शाळा सुरु करण्याचा निर्णय आज रात्री किंवा उद्या (ता. 12) सकाळपर्यंत  जाहीर करु.”

Advertisement

कॉलेजबाबत काय ठरले..?
टोपे म्हणाले, की “प्रत्येक विद्यापीठाचे कुलगुरु, विद्यापीठाच्या अखत्यारित येणारे जिल्हे, तसेच शिक्षण संस्था, यांच्याशी चर्चा करुन आरोग्य विभागाला अहवाल दिला जाईल. त्यानंतरच महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेणार असल्याचे हायर एज्यूकेशन डायरेक्टर यांनी सांगितले आहे.”

“दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालेलं नाही. इतर राज्यात शाळा सुरु केल्यावर विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रिस्क घेऊ नये, असे टास्क फोर्सला वाटतं. आता याबाबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल,” असे टोपे यांनी सांगितले.

Advertisement

हॉटेलला रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी
राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स सुरू करण्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. येत्या १५ ऑगस्टपासून रात्री 10 वाजेपर्यंत हाॅटेल खुली ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हाॅटेलचालकांसाठी नियमावली

Advertisement
  • जेवणासाठी आलेल्या लोकांना वेटिंग पिरयडमध्ये मास्क घालणे बंधनकारक असेल.
  • पूर्ण उपहारगृह सॅनिटाईझ करणे गरजेचे. वेटर्सने मास्क वापरणे बंधनकारक आहे.
  • ग्राहकांची बसण्याची व्यवस्था सोशल डिस्टन्सिंगचा नियम लक्षात घेऊन करावी.
  • सर्व कर्मचारी, तसेच मॅनेजमेंटने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे गरजेचे आहे.

मंगल कार्यालयांना सूट
खुल्या जागेत होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी 200 लोकांची, तर हॉलमधील एकूण जागेच्या 50 टक्के लोकांची मर्यादा असेल. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार.

खासगी कार्यालये 24 तास सुरू
खासगी कार्यालयात एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करता येईल. कर्मचाऱ्यांचे दोन डोस झाले असल्यास शंभर टक्के क्षमतेने कार्यालये सुरू करता येतील.

Advertisement

सिनेमागृहे, मंदिरे कुलुपबंदच
सिनेमागृहे, नाट्यगृहे, धार्मिक स्थळे मात्र कुलुपबंदच असणार आहेत. शॉपिंग मॉल 10 वाजेपर्यंत सुरु राहणार असले, तरी तेथे जाण्यासाठी दोन डोस झालेले असावेत. शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्रथम लसीकरणास प्राधान्य दिले आहे.

लोकलसाठी युनिव्हर्सल पास !
लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासासाठी विशिष्ट पास देण्यात येईल. या पासवर क्यूआर कोड असेल. हा पास ‘युनिव्हर्सल पास’ म्हणून ओळखला जाईल. लोकलसोबतच मेट्रो, मोनोरेल, मॉल किंवा इतर ठिकाणीही तो चालू शकेल.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement