रवी शास्री यांच्यावर गंडांतर, बीसीसीआयने ‘या’ पदासाठी अर्ज मागविले, कोण होणार पुढील प्रशिक्षक जाणून घेण्यासाठी वाचा..!
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर गंडांतर येणार असल्याची चर्चा सुरु आहे. रवी शास्री हे सध्या इंग्लंडमध्ये असून, त्यांच्यासाठी टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून हा अखेरचा इंग्लंडचा दौरा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यूएईमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल होऊ शकतात. कारण रवी शास्त्री यांचा कार्यकाळ नोव्हेंबर-2021 मध्ये संपत आहे. त्यामुळे टी-20 विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री भारतीय संघापासून वेगळं होऊ शकतात.
रवी शास्री यांच्याबरोबर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड हेही भारतीय संघातून बाहेर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच इतर काही सपोर्ट स्टाफही आयपीएल संघांशी आधीच चर्चा करीत आहे.
दरम्यान, रवी शास्त्री यांनीही टी-20 स्पर्धेनंतर ते टीम इंडियापासून वेगळे होण्याचा विचार करीत असल्याचे ‘बीसीसीआय’च्या काही सदस्यांना कळविले आहे. आता ‘बीसीसीआय’लाही भारतीय संघासोबत नवी टीम हवी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
2014 ते 2016 दरम्यान शास्त्री यांनी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्यानंतर त्यांच्या जागी अनिल कुंबळे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, कुंबळे आणि कोहली यांच्यात बिनसल्याने 2017 मध्ये कुंबळे यांच्या जागी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांनाच भारतीय क्रिकेट संघाचे पूर्ण वेळ प्रशिक्षक बनविण्यात आले.
‘बीसीसीआय’ने अर्ज मागविले
बंगळुरूमध्ये असलेल्या नॅशनल क्रिकेट अॅकेडमीच्या (NCA) प्रमुख पदासाठी ‘बीसीसीआय’ने अर्ज मागविले आहेत. सध्या या प्रमुख पदावर राहुल द्रविड आहे. त्याच्या जागेवरच ‘बीसीसीआय’ने अर्ज मागविल्याने द्रविड हा टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार असल्याची चर्चा आहे.
श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या युवा खेळाडूंसोबत राहुल द्रविड टीमचा मुख्य प्रशिक्षक होता. त्यावेळी त्याला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार का, या प्रश्नावर द्रविडने सूचक वक्तव्य केलं होतं.
राहुल द्रविडला काय वाटतं..?
तो म्हणाला, की ‘मी या कामाचा आनंद घेतला; पण मी पुढील काहीही विचार केलेला नाही. या मुलांसोबत काम करताना आनंद मिळाला. आणखी कोणत्याही गोष्टींवर मी विचार केलेला नाही. पूर्ण वेळ ही भूमिका पार पाडण्यासाठी खूप आव्हाने आहेत. त्यामुळे सध्या तरी मला याबाबत काहीही माहिती नाही.’