SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार..! शिक्षण विभागाचा निर्णय अखेर जारी, निकष जाणून घेण्यासाठी वाचा..

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अखेर ती बातमी आलीच.. कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असणाऱ्या राज्यातील शाळांचे दरवाजे अखेर उघडणार आहेत. शाळेची घंटा पुन्हा एकदा वाजणार आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय काही दिवासांपूर्वी जाहीर केला होता. अखेर 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

Advertisement

शासन निर्णयात काय म्हटलंय?
राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते 7 वीचे वर्ग, तर शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12वीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. शाळा सुरु करण्यासाठी महापालिका, नगरपालिका,  ग्रामपंचायत स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून, शाळा सुरु करताना या समितीने दक्षता घ्यायची आहे.

‘त्या’ 11 जिल्ह्यांत काय होणार..?
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यांतील कोविड परिस्थिती विचारात घेवून जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.

Advertisement

शाळा सुरू करण्याचे निकष
– शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहरात/गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
– शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक असून, त्यासाठीचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.

– गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या आवारात प्रवेश करु देऊ नये.
– कोविडसंबंधी सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. (जास्त विद्यार्थी असणाऱ्या शाळा दोन सत्रांत घेणे, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे..).

Advertisement

– विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन वर्ग निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करावी. विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.

– मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलवावे. (वर्ग सकाळी-दुपारी, ठराविक विषयांसाठी प्राधान्य इ. यासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP)चे पालन करावे.

Advertisement

– संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement