SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : अकरावी प्रवेशासाठीची सीईटी रद्द..! मुंबई हायकाेर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल, अशी होणार प्रवेश प्रक्रिया..!

राज्यातील दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. अकरावी प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी होणारी सामाईक प्रवेश परीक्षा, अर्थात ‘सीईटी’ (CET) रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने आज (ता. 10) हा महत्वपूर्ण निकाल दिला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या 16 जुलै रोजी दहावीचा निकाल मूल्यांकन पद्धतीनुसार जाहीर केला. त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षा घेणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. तसे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केले.

Advertisement

राज्य सरकारने ही प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एक ‘पोर्टल’ तयार केले होते. ‘सीईटी’साठी अर्ज करण्याची मुदत 2 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांनी ‘सीईटी’साठी नोंदणी केली होती. राज्य सरकारने 21 ऑगस्ट रोजी ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेणार असल्याचे सांगितले होते.

परीक्षा जाहीर होताच, विद्यार्थी अभ्यासालाही लागले. मात्र, परीक्षा तोंडावर आलेली असतानाच मुंबई हायकोर्टाने ‘सीईटी’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारसाठी हा मोठा दणका आहे.

Advertisement

कशामुळे झाली ‘सीईटी’ परीक्षा रद्द..?
अकरावी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 2 ऑगस्ट रोजी संपली, तर ‘सीबीएसई’ बोर्डाचा दहावीचा निकाल 3 ऑगस्टला जाहीर झाला. त्यामुळे ‘सीबीएसई’ शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण झाली होती.

तसेच, ‘सीईटी’ परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होता. त्यामुळे ‘आयसीएसई’ बोर्डाच्या विद्यार्थ्यांचीही अडचण झाली होती. ‘आयसीएसई’ बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम माहित नाही. त्यामुळे त्यांना परीक्षेत कमी गुण मिळण्याची शक्यता होती.

Advertisement

राज्य सरकारच्या ‘सीईटी’ परीक्षेच्या निर्णयाविरुद्ध ‘आयसीएसई’ बोर्डाची विद्यार्थिनी अनन्या पत्की हिने आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

न्यायमूर्ती आर. डी. धानुका व न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टात राज्य सरकारतर्फे आशुतोष कुंभकेणी यांनी बाजू मांडली. याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी (ता. 6 ऑगस्ट) पूर्ण झाली होती, त्यानंतर कोर्टाने आज अंतिम निर्णय दिला.

Advertisement

हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर अकरावीसाठीची ‘सीईटी’ रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच दहावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश द्या, तसेच सहा आठवड्यांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारचा 28 मे रोजीचा अध्यादेश हायकोर्टाने रद्द केला.

सुनावणी दरम्यान हायकोर्टाने राज्य सरकारच्या निर्णयावरही काही प्रश्न उपस्थित केले. राज्यात अजूनही कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे उठलेले नाहीत. राज्यातील 11 जिल्ह्यांत अजूनही कठोर निर्बंध कायम आहेत.

Advertisement

मुंबईत लोकल ट्रेनमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नाही, मग 21 ऑगस्टला तुम्ही ‘सीईटी’ कशी घेणार ? विद्यार्थी प्रवास कसा करणार ? तसेच सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरणही पूर्ण झालेलं नाही, मग त्यासाठी काय तयारी केलीत? अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement