SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चोर समजून पोलिस निरीक्षकालाच बेदम मारहाण, कोंबड्यांची खरेदी आली अंगलट, पाहा नेमकं काय घडलं..?

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये एक विचित्र घटना घडली. कोंबड्या खरेदी करण्यासाठी आलेल्या सहायक पोलिस निरीक्षकासह चौघांना गावकऱ्यांनी चक्क चोर समजून बेदम मारहाण केली. त्यात हे सगळे गंभीर जखमी झाले आहेत.

बुलडाणा येथील सहायक पोलिस निरीक्षक किरण कांबळे हे नुकतेच अरणगाव येथील आपल्या नातेवाईकांकडे आले होते. किरण कांबळे यांचे भाऊ विशाल भानुदास कांबळे यांचा आष्टी तालुक्यातील पांडेगव्हाण येथे गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय आहे.

Advertisement

खेडोपाडी जाऊन ते कोंबड्यांची खरेदी करीत असतात. कोंबड्या खरेदी करण्यासाठी ते अरणगाव येथे आले होते. तेथे किरण कांबळे, त्यांचे भाऊ विशाल कांबळे, सासरे संजय निकाळजे आणि सुनील निकाळजे आदी त्यांच्यासोबत होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अरणगाव परिसरातील वंजारवाडी येथे दरोडा पडला होता. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण होते. त्यातच गावात एका वाहनातून अनोळखी माणसे आल्याने गावकऱ्यांना त्यांचा संशय आला.

Advertisement

चोर समजून मारहाण
ग्रामस्थांनी त्यांचे वाहन थांबविण्याचा प्रयत्न असता, त्यांनी भरधाव वेगात निघुन जाण्याचा प्रयत्न केला. वाहन न थांबल्याने ते नक्की ‘चोर-दरोडेखोर’ असल्याचे समजून, काही तरुणांनी दुचाकी आडवी घालून वाहन थांबविले. सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह चौघांना वाहनाच्या बाहेर काढून 20 ते 25 जणांनी लोखंडी रॉड, बांबू, दगड व काठीने बेदम मारहाण केली.

दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच गावच्या सरपंचांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या तावडीतून या चौघांची सुटका केली. मात्र, मारहाणीत हे चौघेही गंभीर जखमी झाले आहेत.

Advertisement

25 गावकऱ्यांविरोधात गुन्हा
याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण कांबळे यांनी जामखेड पोलिस ठाण्यात गावकऱ्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार जामखेड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement