मुंबईतील लोकल येत्या स्वातंत्र्यदिनापासून (ता. 15) सुरु करणार आहोत. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेऊन 15 दिवस झाले आहेत, त्यांनाच हा प्रवास करता येईल. त्यासाठी एक अॅप तयार करण्यात येणार असून, त्यावर नोंदणी करावी लागेल. ऑफलाईन पद्धतीनेही नोंदणी करता येईल. त्यानंतर रेल्वे प्रवासासाठी नागरिकांना पास दिले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
तसेच राज्यातील टास्क फोर्सचा उद्या (ता. 9) आढावा घेणार आहोत. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर राज्यातील निर्बंध हटविण्याबाबतचा निर्णय उद्या (सोमवारी) जाहीर करणार असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेला संबोधित केले. सुरवातीला ऑलिम्पिकमधील यशस्वी खेळाडूंचे कौतुक केल्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की नागरिकांचा संयम संपत चालला आहे, पण संयम सोडू नका. कारण अशाच वेळी कोरोना डोके वर काढण्याची शक्यता असते.
आम्हाला बंद करण्यात फार मजा वाटते असे नाही, पण कोविडचे थैमान आपण पाहिले आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळावेच लागतील. लसीकरणाचा वेग वाढविला आहे. लसीचा पुरवठा वाढतोय, तसतसे लसीकरण वाढतेय. लाॅकडाऊन करुन गप्प बसलो नाही. आरोग्य सुविधा वाढविल्या आहेत.
ते म्हणाले, की गेल्या फेब्रुवारीत कोरोनाची लाट ओसरल्याचे वाटले होते. मात्र, नंतर कोरोनाच्या डेल्टा विषाणूचा प्रसार झपाट्याने झाला. राज्यात काही ठिकाणी कोरोनाची परिस्थिती ठिक आहे. मात्र, काही ठिकाणी चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळे तेथे निर्बंध कायम ठेवावे लागणार आहेत.
कोविडसोबत आपण नैसर्गिक संकटाचाही सामना करतोय. कोकणात दरडी कोसळून काही गावांचे नामोनिशाण मिटले. सिक्कीममध्येही असे प्रकार वाढल्याचे तेथील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता आपल्याला कायमस्वरुपी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
मी पॅकेजची घोषणा करणार नसल्याचे सांगितले होते, मात्र कोणालाही वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार, पुरग्रस्तांना 11,500 कोटी रुपये मंजूर करुन दिलासा देण्याचे काम केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून काही मागण्या केल्या होत्या. त्यात एनडीआरएफची मदत करण्याचे निकष बदलले पाहिजे. तसेच आरक्षणावर चर्चा झाली. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढविण्याची मागणी केल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.
कोरोनाचे संकट उलथवून टाकू
सात दिवसांनी आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन येतोय. आपणास स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष फक्त आठवायचा नाही, तर आपणही प्रतिज्ञा घेतली पाहिजे, जसं आपण दीडशे वर्षांचं राज्य उधळून लावलं. तसंच कोरोनाची ही टांगती तलवार उधळून लावू, ती उलथून टाकूच, असे ठाकरे यांनी सांगितले.