सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात नॉटिंगहॅम येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना अत्यंत रंगतदार स्थितीत असून, भारताला विजयासाठी केवळ 157 धावा करायच्या आहेत. मात्र, पावसामुळे सध्या खेळ थांबलेला आहे..
दरम्यान, खेळीमेळीच्या वातावरणात हा सामना सुरु असताना त्याला वादाचे गालबोट लागले. दोन्ही संघातील काही खेळाडूंमध्ये चांगलीच गरमागर्मी झाल्याचे दिसून आले. त्यात आघाडीवर होता, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज..!
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑसी बॅटसमनला आपल्या तेजतर्रार बाॅलिंगने सिराजने घायाळ करुन सोडले होते. त्यामुळे साहजिकच त्याची निवड इंग्लडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी झाली. पहिल्या कसाेटीतही तो चांगल्या लयीत असल्याचे दिसून आले.
मोहम्मद सिराज चांगलाच जोशात दिसत होता. बाॅलिंगदरम्यान 24 तासांच्या खेळात तो दोन इंग्लंडच्या खेळाडूंना थेट भिडला. चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावातील 74 वी ओव्हर खेळत असताना, सिराज आणि सॅम कुरेन यांच्यात खटका उडाला.
सॅम कुरेनसोबत वाद
शांततेत सुरु असलेल्या खेळाचे रुप एकदम बदलले. सॅमला बाद करण्यासाठी सिराज सतत बाऊन्सरचा मारा करीत होता. त्याच वेळी त्याच्यात वाद सुरु झाला. शांत राहिल तो सिराज कसला, तोही थेट सॅमला भिडला. ओव्हरच्या अखेरीस विराटने मध्ये पडून सिराजला शांत केले. मात्र, काही वेळातच सॅम बाद झाला.
अँडरसनलाही भिडला
दरम्यान, सॅम आणि सिराज यांच्यात वाद पेटण्याआधीच 24 तासांपूर्वी सिराजचा इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनसोबत वाद झाला होता. मात्र, त्यावेळी सिराज बॅटिंग, तर अँडरसन गोलंदाजी करीत होता. धाव घेताना अँडरसनने सिराजला धक्का दिल्याचे दिसून आले. त्यामुळे सिराज चांगलाच चिडला होता.
डोमिनिक सिबलीशीही पंगा
इंग्लंडचा सलामीवीर डोमिनिक सिबलीशीही सिराज वाद घालताना दिसला. सिबलीने चौकार मारताच सिराजला राग आला. नंतर त्याने फलंदाजाला स्लेजिंग सुरु केले. डोम्निकला तो सतत चिथवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.