बाप रे..! शेतजमिनीच्या वादातून गोळ्या झाडून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या, कसे घडले हे सामुहिक हत्याकांड जाणून घेण्यासाठी वाचा..
शेतजमिनीचा वाद हा तसा जूनाच विषय. त्यातून कधी भांडणे होतात, तर काही वाद फारच विकोपाला जाऊन हाणामाऱ्या, खूनही झाले आहेत. मात्र, बिहारमधील एका गावात जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची थेट गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य तिघे जखमी झाले आहेत.
बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील लोदीपूर गावात मन सुन्न करणारे हे सामुहिक हत्याकांड झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. जखमींना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मृतांमध्ये एकाच कुटुंबातील यदू यादव, पिंटू यादव, महेश यादव, धीरेंद्र यादव, शिवेंद्र यादव आणि विंदा यादव यांचा समावेश आहे. तर मिट्टू यादव, परशुराम यादव आणि मंटू यादव हे तिघे या गोळीबारात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लोदीपूर येथील 50 बिघा जमिनीवरुन आरोपी महेंद्र यादव, राजेश्वर यादव यांचा वरील कुटुंबाशी वाद सुरु होता. हे प्रकरण न्यायालयात सुरू असतानाही आरोपी जबरदस्तीने ती शेती कसत होते. त्यावरून या दोन्ही कुटुंबात वाद झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला.
आरोपींनी अचानक बंदुकीतून अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात नेताना दोन जणांना जीव गमवावा लागला. या घटनेत तीन जण गंभीररित्या जखमी झाले.
गोळीबार सुरु होताच, पीडित कुटुंबीयांनी छबीलापूर पोलिस स्टेशनला त्याची माहिती दिली. मात्र, पोलिसांनी त्याची दखल घेऊन तातडीने घटनास्थळी आले नाहीत. त्यामुळे इतके मोठे हत्याकांड झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
सामूहिक हत्याकांडामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृताचे कुटुंबीय व गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. या धक्कादायक घटनेनंतर आरोपी पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.