पुण्यातील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत तरुणीचा राडा..! रस्त्याच्या मधोमध झोपून धिंगाणा, नेमक काय घडलं जाणून घेण्यासाठी वाचा..
ठिकाण- पुण्यातील टिळक रस्त्यावरील हिराबाई चौक.. रात्रीची वेळ.. रस्त्यावर वाहनांची गर्दी.. प्रत्येक जण दिवसभराच्या कामामुळे दमून-भागून घराच्या ओढीने निघालेला. मात्र, तिला कशाचीच फिकीर नव्हती. फुल्ल ‘टल्ली’ झालेल्या अवस्थेत ती रस्त्याच्या मधाेमध आडवी झोपलेली..
मध्येच उठून बसत रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न करीत होती, तर कधी आरडाओरडा करीत होती. नसती आफत मागे नको, या विचाराने कोणीही गाडीतून खाली उतरुन तिला सावरण्याचा, तिची समजूत घालण्याचा प्रयत्नही करीत नव्हते.
पुण्यातील टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक परिसरातील हा प्रकार सर्वांसाठीच धक्कादायक होता. दारूच्या नशेत बुडालेली एक उच्चशिक्षीत तरुणी रात्री साडे दहाच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध बसून आरडाओरडा करीत होती. रस्त्यावर थांबून तेथून जाणाऱ्या गाड्या अडविण्याचा प्रयत्न करीत होती.
माझ्या अंगावरून गाडी न्या..!
काहींनी तिला रस्त्यावरून बाजूला जाण्याचीही विनंती केली. मात्र, ती कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ‘माझ्या अंगावरून गाडी न्या..’ असे ती जोरजाेरात ओरडत होती. या तरुणीने घातलेला गोंधळ पाहण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूला हळूहळू चांगलीच गर्दी जमली. कोणी त्या तरुणीचे व्हिडीओ रेकाॅर्डिंग करु लागले. आजूबाजूला एकच चर्चा सुरु झाली.
अखेर कोणीतरी स्थानिकाने फोन करुन पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. खडक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या मुलीची समजूत घालून तिला रस्त्यावरुन बाजूला केले. नंतर अधिक चौकशीसाठी तिला पोलिस ठाण्यात नेण्यात आले नि एका मोठ्या नाट्यावर पडदा पडला.
दरम्यान, पुढे पोलिस ठाण्यात काय घडले, ही मद्यधुंद अवस्थेतील तरुणी कोण होती, तिने कशासाठी हा खेळ मांडला होता, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
शांत, सुसंस्कृत पुण्यासाठी असे प्रकार आता नवे राहिलेले नाहीत. काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील एका आघाडीच्या अभिनेत्रीनेही दारु पिऊन रात्रीच्या वेळी असाच राडा केला होता. यानिमित्ताने त्या घटनेची अनेकांना आठवण झाली..