फ्रेंडशिप डे विशेष..! कशी, कुठे, कधी सुरु झाली मैत्री दिनाची कहाणी ? त्याचा रंजक इतिहास जाणून घेण्यासाठी वाचा..
आज जागतिक फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन.. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध सण-उत्सवाप्रमाणेच यंदाच्या ‘फ्रेंडशिप डे’ वरही कोरोनाचे सावट आहे. मात्र, सोशल मीडियातून एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मैत्रीचं नातं हे जगातलं सर्वात खास नातं. मैत्रीशिवाय हे जीवन अपूर्ण असल्याचे म्हटलं जातं. मैत्रीचं हे नातं सेलिब्रेट करण्यासाठी तशी तर एका वेगळ्या दिवसाची गरज नसते. मात्र, हा दिवस साजरा करण्यामागे एक कहाणी आहे. चला तर मग नक्की कधी, कुठे, कसा सुरू झाला फ्रेंडशिप डे? त्याचा इंटरेस्टिंग इतिहास जाणून घेऊ या..
‘फ्रेंडशिप डे’चा इतिहास
फ्रेंडशिप डेची सुरुवात ही जगातील सर्वांत मोठ्या युद्धात दडल्याचे म्हटले जाते. पहिल्या महायुद्धानंतर अनेक देशांमध्ये आपपसात द्वेष, शत्रुत्वाची भावना होती. या देशांमध्ये प्रेम वाढावे, यासाठी १९३५ मध्ये अमेरिकन सरकारने फ्रेंडशिप डेची सुरुवात केल्याचे सांगितले जाते.
फ्रेंडशिप डे सुरवात होण्यामागे आणखी एक इतिहास सांगितला जातो. अमेरिकन सरकारने १९३५ मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका निर्दोष व्यक्तीला बळी घेतला. ज्या व्यक्तीला मारलं, त्याच्या मित्राने आपल्या मित्राच्या आठवणीत आत्महत्या केली.
नंतर दक्षिण आफ्रिकी लोकांनी ऑगस्टचा पहिला दिवस ‘इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे’ (International Friendship Day) म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकारसमोर ठेवला. अखेर अमेरिकन सरकारने तब्बल २१ वर्षांनी १९५८ मध्ये तसा प्रस्ताव मंजूर केला.
जागतिक पातळीवरील विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. २७ एप्रिल २०११ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत ३० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या मान्य केला.
फ्रेंडशिप डेचा एकंदरीत इतिहास पाहता, व्हॅलेंटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे, चॉकलेट डे यांसारख्या दिवसांप्रमाणे फ्रेंडशिप डे चाही पायंडा पाश्चिमात्य देशांमध्येच पुढे आल्याचे दिसते.