SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नैसर्गिक आपत्तीत कारचे नुकसान झाल्यास विमा भरपाई मिळणार का, कायदा काय सांगतो ? जाणून घेण्यासाठी वाचा..!

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने कोकण किनारपट्टी, तसेच पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढले. अनेक गावे, शहरात पुराचे पाणी घुसले होते. त्यात घरांसह दाराबाहेर लावलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. काही वाहने पुराबरोबर वाहून गेली, तर काही सतत पाण्याखाली राहिल्याने आता सुरु होत नाहीत.

आपल्या गाडीचे काहीही नुकसान झाले, की आपण पहिला आधार घेतो तो विम्याचा.! वाहनाच्या नुकसान भरपाईसाठी विम्याची कागदपत्रे धुंडाळू लागतो. एखादा अपघात वा नैसर्गिक आपत्तीत वाहनाचे नुकसान झाले, तरी विमा कंपनी देईल की सगळी भरपाई, असा आपला गोड गैरसमज असतो; मात्र तसे नाही.

Advertisement

आपण वाहनासाठी इन्शुरन्सचा कोणता प्रकार निवडलाय, त्यावर भरपाई मिळणार की नाही, हे ठरते. नैसर्गिक आपत्तीत कारचे मोठे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळविण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते, हे आपण जाणून घेणार आहोत.

मोटार वाहन कायद्यानुसार, प्रत्येक वाहनाचा विमा उतरविलेला असायलाच हवा. त्यात ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ही वैध ठरतो. पण, नैसर्गिक आपत्तीत वाहनाचे नुकसान झाल्यास त्यासाठीची भरपाई हवी असेल, तर ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज’ असलेला विमा असणेच गरजेचे आहे.

Advertisement

नैसर्गिक आपत्तीत वाहनाचे नुकसान झाल्यास ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’मधून भरपाई मिळत नाही. यासंबंधीचे नियम माहिती असणं गरजेचे आहे. मात्र, तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा (Comprehensive Policy) असेल, तर नैसर्गिक आपत्तीत वाहनाचे नुकसान झालं, तरी तुम्ही भरपाईसाठी क्लेम करू शकता.

पावसाळ्यात वाहनावर झाड पडले, भूस्खलन वा पुरामुळे वाहनाचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी’ असल्यास क्लेम करता येतो. त्यासाठी तातडीने इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधून माहिती द्यावी.

Advertisement

कंपनीने सांगितलेल्या नियमांचं पालन करावं. आपत्तीग्रस्त वाहनाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणेही आवश्यक आहे. त्याशिवाय कंपनीने मागितलेली कागदपत्रेही द्यावी लागतात. त्यानंतर तुम्ही नुकसान भरपाईसाठी क्लेम करू शकता.

दरम्यान, नैसर्गिक आपत्तीचा धोका जास्त असणाऱ्या प्रदेशातील वाहनचालकांनी तरी ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी’ काढणे गरेजेचे आहे. नैसर्गिक आपत्तीत वाहनाचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी क्लेम करता येतो, नाहीतर पॉलिसी असूनही नुकसानीच्या वेळी काही उपयोग होत नाही.

Advertisement