बाॅलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार, हा राष्ट्रीय प्रश्न बनल्याचे उपहासाने बोलले जाते. सलमान खान आणि लग्न, ही आता दूरची गोष्ट झालीय.
दरम्यान, सलमान खान लग्न करणार की नाही, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न. मात्र, आपल्या या आवडत्या सल्लूचे नाव चक्क एका गावाला दिल्याचे समोर आलेय. सलमान खानच्या गौरवाखातर हे नामकरण केलेले नाही, तर या गावातील तरुणांची लग्नेच होत नसल्याने गावाला ‘सल्लू’ हे नाव देण्यात आलेय.
कर्नाटकमधील गडाग जिल्ह्यातील राॅन तालुक्यात हे गाव आहे. पूर्वी या छोट्याशा खेड्याचे नाव ‘गडागोली’ असे होते. मात्र, गेल्या १० वर्षांपासून या गावातील अविवाहित तरुणांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी गावाचे नामकरण सलमान खानच्या नावावरुन केलंय.
गावातील बहुतेक तरुण हे शेतकरी आहेत. बायको मिळवून देण्यासाठी आता ते माजी मंत्री सी. सी. पाटील आणि स्थानिक आमदारांना साकडे घालत आहेत. मदत करण्याची विनंती करीत आहेत. मात्र, मुलीकडचे लोक या पूरग्रस्त गावातील तरुणांना मुली द्यायला तयार नाहीत.
पुरामुळे गावाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे मागील काही वर्षांत नवीन गावात 500 घरे बांधण्यात आली. मात्र, अजून ती पूरग्रस्तांना दिलेली नाहीत. त्यामुळे या गावातील अनेकांकडे राहायला चांगली घरे नाहीत, अनेक घरांना दारे-खिडक्या नाहीत.
गावात कधी दुष्काळ, तर कधी महापूर, यामुळे येथील शेतकरीही आर्थिक संकटात आहेत. शेती असली, तरी ती पिकत नसल्याने तरुणांच्या हाताला काम नाही. गावाच्या या अवस्थेमुळे इथल्या युवकांना लग्नासाठी नवरीच मिळत नाही. मुलांच्या लग्नाचे प्रस्ताव नाकारले जात आहेत.
तब्बल 120 युवक अविवाहित
सध्या गावात 30 ते 40 या वयोगटातील तब्बल 120 युवक अविवाहित आहेत. आजही आम्ही राहण्यासाठी चांगली घरे मिळतील, याची वाट पाहत असल्याचे एका तरुणाने सांगितले. तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसताना, मुलींच्या बाबतीत वेगळीच परिस्थिती आहे.
“राॅन तालुक्यात एक नवीन गाव तयार होत आहे, पण काही गावकऱ्यांनी पूर्वी स्थलांतर करण्यास नकार दिला. आता हा परिसर काटे आणि झुडपांनी भरला आहे. आम्ही परिसर स्वच्छ करू, काही घरांची दुरुस्तीही करू, अशी ग्वाही एका अधिकाऱ्यांनी दिली.