SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

डीसीपी मॅडमना हवीय मटन बिर्याणी, कोळंबी नि बोंबील, तेही फुकट.! ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश..!

पुण्यातील एका डीसीपी मॅडमला (पोलिस उपायुक्त) ‘एसपी हॉटेल’ची बिर्याणी हवी होती, तीही मोफत..! मग काय लगेच डीसीपी मॅडमने फोन फिरवला.. आपल्या कर्मचाऱ्याकडे तातडीने फर्माईश केली.

आता त्यांची फर्माईश पुरी झाली की नाही, हे काही समजले नाही. मात्र, त्यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली नि एकच खळबळ उडाली.. सोशल मीडियावर ही क्लिप मोठ्या प्रमाणात होत आहे. (आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करीत नाही.)

Advertisement

डीसीपी मॅडम व या कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या संभाषणाची ही जवळपास 5 मिनिटांची ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर आपल्या कर्मचाऱ्याकडे करतात.

Advertisement

बरं.. या मॅडमना हे सगळं चांगल्या हॉटेलमधून हवंय. ते जास्त तेलकट, तिखटही नकोय. शिवाय त्याची चव चांगली असावी, असाही त्यांचा हट्ट आहे. डीसीपी मॅडम आपल्या कर्मचाऱ्यास फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत, तर त्यांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमधून पदार्थ आणण्यासाठी कुठं पैसे देतात का?, असा सवालही केला.

आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं कर्मचारी सांगतो, तर या मॅडम सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळते. डीसीपी मॅडमच्या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी आता थेट पोलिस महासंचालकांनाच पत्र लिहिल्याचे समोर येतेय.

Advertisement

चौकशीचे आदेश दिले : वळसे पाटील
डीसीपी मॅडम व कर्मचाऱ्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप माध्यमातून समोर आल्यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्याची तातडीने दखल घेतली. हा प्रकार गंभीर असून, त्याची त्वरित चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

आपल्या विरोधात एक षडयंत्र
दरम्यान, ही ऑडिओ क्लिप म्हणजे आपल्या विरोधात एक षडयंत्र असून, चौकशीतून सत्य समोर येईल, असे डीसीपी मॅडमनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणात पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement