श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघामागील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकल्यावर भारतीय संघामागे शुक्ल काष्ठ लागले. सगळ्या गोष्टी भारतीय टीमसाठी प्रतिकूल ठरत आहेत.
श्रीलंकेविरुरद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यामुळे त्याच्या संपर्कातील आलेल्या 9 खेळाडूंनाही क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात बॅटिंगसाठीही भारताकडे खेळाडू नव्हते. त्यामुळे चक्क ६ बाॅलरचा समावेश करावा लागला.
दरम्यान, मालिकेतील अखेरचा सामना आज रात्री होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आलीय. वेगवान बाॅलर नवदीप सैनी याच्या खांद्याला कालच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो या सामन्यात खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
टी-२० दुसऱ्या सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमध्ये फिल्डिंग करताना नवदीप मैदानावर पडला होता. त्यामुळे कॅप्टन शिखर धवन याने त्याला मॅचमध्ये एकही ओव्हर बॉलिंग दिली नाही. टीम इंडियाचे बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांनी सांगितले, की ‘सैनीवर मेडिकल टीमचं लक्ष आहे. त्याच्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल.’
कोरोनोमुळे याआधी कृणाल पांड्या, त्याच्या संपर्कात आलेले पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृष्णप्पा गौतम, मनिष पांडे, इशान किशन, युजवेंद्र चहल, दीपक चहर हे नऊ खेळाडू मालिकेतून आऊट झाले होते. त्यानंतर आता मालिकेतून बाहेर होणारा सैनी हा 10 वा खेळाडू असेल.
भारतीय संघाने सरावासाठी 5 नेट बॉलर्स सोबत नेले होते. संघ अडचणीत आल्याने आता त्यांनाच मैदानात उतरविण्याची वेळ आलीय. त्यात 4 फास्ट बॉलर आहेत. मात्र, कोलंबोची पिच स्पिनर्ससाठी मदतगार ठरत आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या साई किशोरला पदार्पणाची संधी मिळू शकते.
अर्शदीप सिंह, संदीप वॉरियर, इशान परोळ आणि सिमरजीत सिंह हे चार फास्ट बॉलर्स देखील निवडीसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे.