‘ओबीसी’ आरक्षणाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही होणार मोठा फायदा, नेमका काय निर्णय घेतलाय जाणून घेण्यासाठी वाचा..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय समाजाला मिळणारे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले होते. त्यानंतर महाराष्ट्रात आघाडी सरकारविरुद्ध एकच आगडोंब उसळला होता.
सरकारने न्यायालयात याेग्य प्रकारे बाजू न मांडल्यानेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेल्याचे आरोप विरोधकांनी केले. त्याला सरकारच्या बाजूनेही प्रत्युत्तर देण्यात आले. यानिमित्ताने ओबीसी आरक्षणावरच गडांतर आल्याच्याही अफवा पसरविण्यात आल्या.
अखेर ‘ओबीसी’ आरक्षणासाठी लढणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. देशातील वैद्यकीय प्रवेशात ‘ओबीसीं’ना 27 टक्के आरक्षण लागू करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
मेडिकल प्रवेशासाठी आतापर्यंत ‘एससी’ आणि ‘एसटी’साठीच जागा आरक्षित होत्या. मात्र, आता ‘ओबीसीं’साठीही राखीव जागा असणार आहेत. ओबीसींना मेडीकल प्रवेशात आरक्षण देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. हे प्रकरण कोर्टातही गेलं होतं.
अखेर देशभरातील ‘ओबीसीं’च्या लढ्याला मोठे यश आलं. वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण करण्यात येणार आहे. कमीत कमी कालावधीत हा प्रश्न सोडवावा आणि कोर्टा बाहेर त्यावर सहमती व्हावी, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले होते.
‘ऑल इंडिया कोटा’ अंतर्गत ‘ओबीसीं’ना वैद्यकीय प्रवेशात ‘एमबीबीएस’सह पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही आरक्षण देण्याच्या सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. लवकरच याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यत आले.
पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच केंद्रीय शिक्षण आणि आरोग्य मंत्रालयाची बैठक घेतली. त्याला विधी व सामाजिक न्याय विभागाशी संबंधित लोकही उपस्थित होते. या वेळी मोदींनी हे आदेश देतानाच आर्थिकदृष्ट्या कमकुवत (ESW) असलेल्या लोकांच्या आरक्षणावरही काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘ओबीसी’ आरक्षणाचा मुद्दा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपमधील एक मोठा गट ‘ओबीसी’ आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळेच मोदींनी या मुद्द्याकडे विशेष लक्ष दिले आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांनाही वैद्यकीय प्रवेशात राखीव जागा ठेवण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत.
महाराष्ट्राला किती फायदा होणार?
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डाॅ. बबनराव तायवाडे म्हणाले, की देशातील वैद्यकीय प्रवेशात ‘ओबीसी’ विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षण मिळणार आहे. त्याचा महाराष्ट्रातील 700 ते 800 ओबीसी विद्यार्थ्यांना फायदा होणार असून, देशभरात हजारो ‘ओबीसी’ विद्यार्थ्यांना प्रवेशात लाभ होणार आहे.