SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लग्नानंतर 15 दिवसांत नवरा पळून गेला..! नव्या जिद्दीने ती बनली ‘आयएएस’ ऑफिसर, एका महिलेची प्रेरणादायी यशोगाथा..!

‘चूल आणि मूल’.. रांधा, वाढा उष्टी खरकटी काढा.. या जूनाट विचारसरणीतून आजची भारतीय नारी खूप पुढे आलीय. पुरुषांच्या बराेबरीने, खांद्याला खांदा लावून आज ती काम करीत असली, तरी भारतीय मानसिकता बदललेली नाही. त्यातही एखाद्या स्त्रीला तिच्या नवऱ्याने टाकले असेल तर..

लग्न स्त्रीला परिपूर्ण बनवितं, असा एक समज असतो. भारतीय समाजात आजही महिलेची ओळख तिच्या पतीवरून केली जाते. पण, एखाद्या महिलेसाठी लग्न हेच सगळं काही नसतं, एखादी स्त्री मनात आणलं, तर स्वकर्तृत्वातून तिची वेगळी ओळख तयार करु शकते..

Advertisement

गुजरातमधील कोमल गनात्रा या ‘आयएएस’ अधिकारी महिलेनं हे सिद्ध करुन दाखविले. स्वतःच्या हिंमतीवर समाजात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या तरूणींसाठी कोमल यांची कहाणी प्रेरणादायी आहे.

कोमल गनात्रा आज आयपीएस अधिकारी असल्या, त्यांनी स्वत:ची वेगळी, यशस्वी ओळख निर्माण केली असली, तरी त्यांना हे यश एका रात्रीत मिळालेले नाही. त्यामागे मोठे कष्ट आहेत, त्याग आहे. समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाशी दोन हात करण्याचे धैर्य आहे. या यशापलीकडे त्यांच्या आयुष्यात बरंच काही घडलंय.

Advertisement

वयाच्या २६ वर्षी कोमल यांचा एका ‘एनआरआय’सोबत विवाह झाला. मात्र, लग्नानंतर १५ दिवसांनीच त्यांचा पती न्यूझिलंडला पळून गेला, तो परत आलाच नाही. त्यांच्यावर आभाळच कोसळले. पुढे सगळा अंधार दिसत होता.

गुजरात लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा लग्नाआधीच त्यांनी क्लियर केली होती. त्याच काळात त्यांचा विवाह ‘एनआरआय’शी झाला. पतीने ‘जीपीएससी’ची मुलाखत देण्यास नकार दिला, कारण त्यांना न्यूझीलंडमध्ये राहायचे होते. त्यांनीही परिस्थितीशी जुळवून घेत पतीचे म्हणणे ऐकले.

Advertisement

पती न्यूझीलंडला गेल्यावर त्याने एकही कॉलही त्यांना केला नाही. पतीच्या पाठीमागे न्यूझीलंडला जावून त्यांना घेऊन परत यावे, असे त्यांना वाटत होते. काही कालावधीनंतर त्यांना जाणीव झाली, की कोणालाही जबरदस्तीने आपण आपल्या आयुष्यात आणू शकत नाही.

एखाद्या व्यक्तीमागे धावत राहणे हे जीवनाचे ध्येय असू शकत नाही. त्यातून त्यांना जीवनाचे लक्ष्य स्पष्ट दिसू लागले. काहींनी पतीसोबत घटस्फोट घेऊन पुन्हा लग्न करण्याचाही सल्ला दिला. परंतु, कोमल यांना आता त्याच नात्यात गुरफाटायचे नव्हते.

Advertisement

कोमल यांनी ‘यूपीएससी’ची तयारी सुरु केली. या दरम्यान 5000 रूपये पगारावर टीचरची नोकरी केली. आई-वडील, सासरपासून दूर एका गावात त्या राहू लागल्या. इंटरनेट, मॅग्झीन, इंग्रजी वृत्तपत्रही मिळत नसताना त्यांनी ‘यूपीएससी’चा अभ्यास केला.

कोमल यांनी तीन वेळा ‘यूपीएससी’ची परिक्षा दिली. २०१२मध्ये त्यांना यश आले. आता त्या संरक्षण मंत्रालयात ‘आयएएस’ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Advertisement

एखाद्या महिलेचे आयुष्य तिच्या नवऱ्याभोवतीच फिरत राहू शकत नाही. स्वप्ने पाहण्याचा, ती पूर्ण करण्याचा, स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार तिलाही आहे. अशा साऱ्या महिलांसाठी कोमल यांची कहाणी प्रेरणादायी आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement