SpreadIt News | Digital Newspaper

एका चार्जिंगमध्ये 500 किलोमीटरची रनिंग..! टाटा आणतेय अनोखी इलेक्ट्रिक कार, फिचर्स जाणून घेण्यासाठी वाचा..!

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे हैराण झालेले नागरिक आता ईलेक्ट्रिक वाहनांकडे वळू लागले आहेत. त्यातून हे शतक इलेक्ट्रिक कारचे असणार, याची प्रचिती येत आहे. भारतातही आता इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक कंपन्या नवनवीन इलेक्ट्रिक कार लाँच करीत आहेत.

सध्या टाटांच्या ताफ्यात ३ ईलेक्ट्रिक कार आहेत. भारतात कोणत्याही कंपनीकडे एवढ्या कार नाहीत. टाटाकडे टियागो (Tiago-EV), टिगोर (Tigor EV) आणि सर्वाधिक लोकप्रिय नेक्सन (Nexon EV) या कार आहेत.

Advertisement

नेक्सन ईव्हीला मिळालेल्या जोरदार प्रतिसादानंतर टाटा मोटर्स आता ‘फाईव्ह स्टार रेटिंग’ मिळालेली टाटा अल्ट्राॅझ (Tata Altroz EV) ही कार लाॅंच करण्याची तयारी करीत आहे. ही देशातील सर्वात सुरक्षित ‘हॅचबॅक’ कार आहे.

भारतात लवकर लाॅंच होणाऱ्या या कारची रेंज इतकी मोठी आहे, की भारतात अजून तेवढ्या रेंजची कार लाॅंच झालेली नाही. बाजारात याबाबत जोरदार चर्चा आहे.

Advertisement

टियागो व टिगाॅरची रेंज सध्या ११० किलोमीटर असून, लवकरच त्यात दुप्पट वाढ केली जाणार आहे. लोकप्रिय नेक्सन ईव्हीची रेंज ३१० किलोमीटर आहे. मात्र, प्रत्यक्षात २५० किमीच्या आसपास रेंज मिळत असल्याचा ग्राहकांचा अनुभव आहे.

टाटा मोटर्स आता जी कार लाॅंच करणार आहे, तिची रेंज थोडीथोडकी नव्हे, तर ५०० किमी असल्याचे सांगितले जात आहे. ‘टाटा अल्ट्राॅज’च्या उत्पादनासाठी नवी प्राॅडक्शन लाईन उभारण्याचे काम सुरु झाल्याचे समजते.

Advertisement

‘टाटा अल्ट्राॅज’मध्ये झिपट्रोनिक (Ziptronic) ईलेक्ट्रिक पावरट्रेनचा वापर केला जाणार आहे. हीच प्रणाली नेक्सन ईव्हीमध्येही वापरली असली, तरी त्या तुलनेत ‘टाटा अल्ट्राॅज’मध्ये मोठी बॅटरी दिली जाणार आहे. त्यामुळे ‘टाटा अल्ट्राॅज’ची रेंज नेक्सनपेक्षा २५ ते ४० टक्के अधिक असेल. थोडक्यात या कारमध्ये ४५० ते ५०० किमीच्या आसपास रेंज मिळणार आहे.

दरम्यान, ‘टाटा अल्ट्राॅज’ नंतर नेक्सन ईव्ही कारमध्येही नवीन बॅटरी पॅक दिला जाणार आहे. सध्या या कारमध्ये ३०.२ KWh बॅटरी पॅक मिळतो.

Advertisement

‘टाटा अल्ट्राॅज’ची किंमत
‘टाटा अल्ट्राॅज’ कारची किंमत १२ लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. मात्र, भारत सरकारच्या FAME-II स्किममध्ये ‘टाटा अल्ट्राॅज’ या कारवर सबसिडी मिळणार आहे. तसेच राज्य सरकारचीही सबसिडी मिळेल. त्यामुळे ही कार ९ ते १० लाख रुपयांपर्यंत मिळेल. या कार चार्ज करण्यासाठी टाटा मोटर्स ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशनही उभारणार असल्याचे समजले.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement