SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ दोन मोठ्या बँकांच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू; तुमचं तर या बँकेत खातं नाही ना?

काही महिन्यांपासून इंडियन ओव्हरसीज बँक (IOB)सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) या दोन मोठ्या बँकांच्या खासगीकरणाची (Privatisation of banks) चर्चा चालू आहे. गेल्या महिन्यातही यावर सरकारच्या मंत्रिगटाची चर्चा झाली. येत्या काही दिवसांमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओवरसीज बँकेचे खासगीकरण होण्याची दाट शक्यता आहे.

केंद्र सरकारमधील उच्चस्तरीय समितीमध्ये आर्थिक विभाग, महसूल, राजस्व, कॉर्पोरेट, कर आणि विधी विभागातील सचिवांचा समावेश आहे. सरकारी बँकांच्या स्थितीचा पूर्णपणे आढावा घेऊन खासगीकरणासाठी शिफारशी करण्यात येतील. केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्गुंतवणुकीबाबत निर्णय घेणाऱ्या पर्यायी यंत्रणेच्या मंत्रिगटासमोर नियामक आणि प्रशासकीय मुद्द्यांचा अहवाल मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

Advertisement

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाकडे आता हा प्रस्ताव अखेरच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर बँकांच्या खासगीकरणासाठी आवश्यक नियामक बदल केले जातील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि कोळसा मंत्री या बैठकीला उपस्थित होते.

सार्वजनिक क्षेत्रांमधील बँका आणि इतर उद्योगांमधला 2021-22 या आर्थिक वर्षात आपला हिस्सा विकून त्याद्वारे तब्बल 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यानुसार देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2021च्या अर्थसंकल्पीय (Budget) भाषणात सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती.

Advertisement

त्या वेळी आयडीबीआय बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका आणि एका विमा कंपनीच्या खासगीकरणाचा प्रस्ताव आणणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर एप्रिलमध्ये नीती आयोगानं खासगीकरणासाठी काही बँकांच्या नावांची शिफारस केली.

सरकारनं खासगीकरणासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया (BOI), इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकांची नावे निवडली असल्याची समोर आलं होतं. या चार बँकांपैकी दोन बँकांचं खासगीकरण 2021-22 या आर्थिक वर्षात होणार आहे. त्याकरिता इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement