इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला दुखापतीने घेरले आहे. आधी सलामीवीर शुभमन गिल, त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर व आवेश खान हे दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर पडले. त्यामुळे त्यांना परत बोलाविण्यात आले आहे.
भारतीय संघ व्यवस्थापनाने या खेळाडूंच्या बदल्यात ‘रिप्लेसमेंट’ म्हणून दोन सलामीवीरांसह ऑफस्पिनरची मागणी केली होती. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध वन-डेत दमदार कामगिरी करणारा सलामीवीर पृथ्वी शॉ व मालिकावीर सूर्यकुमार यादव, तसेच फिरकीपटू जयंत यादव यांच्यासाठी कसोटीचे दार उघडले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या खेळाडूंना पाठविण्याची तयारी ‘बीसीसीआय’ने केली आहे. आयपीएलसह श्रीलंका दौऱ्यात शॉ आणि सूर्याने भन्नाट कामगिरी केली. ऑफस्पीन बाॅलिंगसग वेळ पडल्यास चांगली फलंदाजी करण्याची क्षमता असल्याने जयंत यादव याला संधी देण्यात आली आहे.
पृथ्वी व सूर्यकुमार सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून, जयंत भारतात आहे. शुभमन गिल दुखापतग्रस्त होताच, भारतीय संघाने शॉला इंग्लंडला पाठविण्याची मागणी केली होती. मात्र, ‘बीसीसीआय’ने ती मागणी मान्य केली नाही. मात्र, दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या वाढल्याने आता तीन अतिरिक्त खेळाडू इंग्लंडला पाठविण्यात येणार आहेत.
सराव सामन्यात काउंटी संघाकडून खेळताना हनुमा विहारीच्या शॉटमुळे आवेश खान जखमी झाला. बोटाच्या दुखापतीमुळे सुंदरने सराव सामन्यातही गोलंदाजी केली नव्हती. या दुखापतीमुळे सुंदर जवळपास दीड महिना मैदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट
दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.
टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, के.एल. राहुल आणि वृद्धिमान साहा.
राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्जान नाग्वासवाला.