SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने रचला इतिहास..! मोठ्या भावाला न उचलणारी लाकडे लिलया पेलणाऱ्या मीराबाईचा खडतर प्रवास जाणून घेण्यासाठी वाचा..!

जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने भारताला आज पहिले पदक मिळवून दिले. वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनगटात तिने रौप्य पदकाची कमाई केली.

मणिपूरमधील छोटेसे गाव ते टोकियो ऑलिम्पिक, हा मीराबाईचा प्रवास सोपा नाही. त्यामागे संघर्ष आहे, परिश्रम आहेत. खूप मोठ्या खडतर मेहनतीनंतर मीराबाईला हा आजचा ‘सोनियाचा दिन’ पाहायला मिळालाय. यानिमित्ताने मीराबाईचा हा प्रवास कसा झाला, याचा घेतलेला मागोवा..

Advertisement

26 वर्षीय मीराबाईचे पूर्ण नाव साइखोम मीराबाई चानू. मणिपूरमधील इम्फाळपासून 22 किलोमीटरवर असलेल्या ‘नाॅनगोक काकचिंग’ (Nongok kakching) या छोट्याशा खेडेगावात तिचा जन्म झाला. 6 भावंडात ती सर्वात छोटी..!

लहाणपणी मीराबाई आपल्या भावंडांसोबत पहाडावर लाकडं गोळा करायला जायची. एकदा तर भावाला न उचलता येणारा लाकडाचा भारा 12 वर्षांच्या मीराबाईने सहज उचलला. इतकेच नाही, तर दोन किलोमीटरवर असणाऱ्या घरी तो भारा ती घेऊन आली होती.

Advertisement

मीराबाईच्या घरची परिस्थिती बेताची. मात्र, मणिपूरच्याच कुंजुरानीला पाहून तिनेही वेटलिफ्टर होण्याचा निश्चय केला. २००७ मध्ये तिने वेटलिप्टींगच्या सरावाला सुरुवात केली. त्यावेळी तिच्याकडे लोखंडी रॉड नव्हते. त्यामुळे लाकडी रॉडनेच ती सराव करीत असे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू होण्यासाठी आहारावर लक्ष देणं गरजेचं होतं; पण मीराबाईच्या आहाराची गरज पूर्ण करणं, तिच्या कुटुंबीयांना परवडणारं नव्हतं. मात्र, मीराबाईच्या आईने खडतर मेहनत घेत, तिच्या आहारात कोणताही कमतरता येणार नाही, याची काळजी घेतली.

वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी दररोज पहाटे उठून २२ किलोमीटरचा प्रवास करुन इम्फाळ येथील प्रशिक्षण केंद्रात मीराबाईला यावं लागायचं. तेथून परत घरी आल्यानंतर शाळेची तयारी, शाळेतून घरी आल्यावर अभ्यास, यातच तिचा संपूर्ण दिवस निघून जायचा.

Advertisement

2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाईच्या पदरी निराशा आली. त्यातून ती नैराश्यात गेली. ‘नको ही वेटलिफ्टिंग’ असे म्हणत तिने निवृत्त होण्याचाही विचार केला; पण नंतर नैराश्य झटकून ती पुन्हा तयारीला लागली नि टोकियोमध्ये इतिहास रचला गेला.

2000 साली सिडनी ऑलम्पिकमध्ये कर्नम मल्लेश्वरी हिने कांस्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी मीराबाई चानू दुसरी भारतीय महिला ठरलीय. तसेच ऑलिम्पिंकमध्ये ‘सिल्वर’ जिंकणारी मीराबाई ही बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू हिच्यानंतर दुसरीच भारतीय महिला ठरलीय.

Advertisement

मीराबाईनं याआधी २०१४ मध्ये ग्लासगोमध्ये झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत कांस्यपदक, तर जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. 2018 मध्ये तिला भारत सरकारने ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार, तसेच नंतर तिला क्रीडा विभागातून पद्मश्री पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला होता.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement