घरगुती वीजमीटरही होणार ‘प्रीपेड’, ‘पोस्टपेड’..! मोबाईल सीमकार्डप्रमाणे वापर करता येणार, ‘स्मार्ट मीटर’बाबत जाणून घेण्यासाठी वाचा..
वीजबिल जादा येत असल्याची घरगुती वीज ग्राहकांची नेहमीची तक्रार असते. त्यासाठी सगळे खापर वीज मीटरचे रिडिंग घेणाऱ्यावरच फोडले जाते. त्यातून अनेकदा वाद होतात. अशा तक्रारींवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी ऊर्जा विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
घरगुती वीज ग्राहकांना आता ‘स्मार्ट मीटर’ दिले जाणार आहेत. त्यानुसार प्राथमिक स्तरावर मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद यांसारख्या महानगरात हे ‘स्मार्ट मीटर’ बसविण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.
मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री राऊत यांनी ‘स्मार्ट मीटर’ योजनेबाबत आढावा घेतला. राज्यात लवकरच अत्याधुनिक ‘स्मार्ट मीटर’ बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी काढलेल्या टेंडरमध्ये केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार दुरुस्ती करण्याची सूचना राऊत यांनी दिली.
कशी असणार ही ‘स्मार्ट मीटर’..?
मोबाईलमधील सिमकार्डच्या वापराप्रमाणे ‘प्रीपेड’ आणि ‘पोस्टपेड’ स्वरुपात हे ‘स्मार्ट मीटर’ असतील. त्यामुळे वीज वापरानुसारच ग्राहकांना बिल येईल, तसेच ग्राहक ‘प्रीपेड’ मीटरमध्ये जितके पैसे जमा आहेत, त्यानुसारच वीज वापरता येईल.
‘स्मार्ट मीटर’मुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. परिणामी, विजेचीही बचत होऊन बिल बिनचूक दिले जाईल. मीटरमध्ये कोणी छेडछाड करुन वीजचोरीचा प्रयत्न केल्यास मुख्यालयाला लगेच त्याची माहिती मिळेल. त्यामुळे वीजचोरीला आळा बसेल.
‘स्मार्ट मीटर’मुळे दूरस्थ पध्दतीने माहितीची देवाण-घेवाण आणि वीजभाराचे व्यवस्थापन कमी वेळेत करता येईल. त्यामुळे ग्रीडचे व्यवस्थापन ‘स्मार्ट’ पध्दतीने करता येईल.
दूरस्थ पद्धतीने मीटर चालू किंवा बंद करता येईल, त्यामुळे खर्चावर नियंत्रण येईल. दूरस्थ पद्धतीने बसून मीटरमध्ये संचित झालेला डेटा मुख्यालयात परिक्षणासाठी घेतला जाऊ शकतो.
जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढणार
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेतून अनुसूचित जाती-जमातीतील ग्राहकांना नाममात्र दरात वीजजोडणी दिली जाते. आता त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचा आदेश राऊत यांनी प्रशासनाला दिले.
ही योजना केवळ दोन समाजापुरती मर्यादित न राहता, ती सर्वसमावेशक करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना मंत्री राऊत यांनी केली.