ब्रेकिंग : अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षेची तारीख जाहीर, कधी होणार ही परीक्षा जाणून घेण्यासाठी वाचा
दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक ‘सीईटी’ परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होते. त्यानुसार आता 11 वी प्रवेशासाठी होणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
अकरावी प्रवेशासाठी 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेदरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे 10वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना आता ‘सीईटी’च्या तयारीला लागावे लागणार आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. त्यासाठी 20 जुलैपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘सीईटी’ परीक्षा ‘ओएमआर’ उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना 178 रुपये अर्ज नोंदणीसाठी शुल्क भरावे लागणार आहे.
अर्ज नोंदणी करताना, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडता येणार. राज्य शिक्षण मंडळामार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
सीईटी परीक्षा ऐच्छिक असून, 100 गुणांसाठी गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इंग्रजी या विषयांचे प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत.
सीईटी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे. अकरावी प्रवेशप्रक्रियेत सीईटी परीक्षा देणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.
सीईटी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना 10 वीतील गुणांच्या आधारे दिले जाणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले होते.