SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये साखळीतच धुमश्चक्री..! टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक एकाच गटात, ‘आयसीसी’कडून गटविभागणी जाहीर..!

भारतीय क्रिकेट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे, टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये ‘सुपर-१२’च्या एकाच गटात भारत व पाकिस्तान या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांना या दोन्ही संघातील धुमश्चक्री पाहायला मिळणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ओमान आणि संयुक्त अरब अमिराती येथे ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान टी-२० विश्वचषक आयोजित करण्याचे ठरविले आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. त्यासाठी ‘आयसीसी’ने शुक्रवारी (१६ जुलै) संघांची गटवारी जाहीर केली.

Advertisement

संघांची गट विभागणी २० मार्च २०२१ पर्यंतच्या संघांच्या क्रमवारीनुसार केलीय. त्यात अव्वल ८ स्थानांवरील संघांचा थेट ‘सुपर- १२’मध्ये समावेश केला आहे. अन्य ८ संघांत पहिली फेरी होऊन, त्यातील ४ संघ (प्रत्येक गटातील अव्वल २ संघ) ‘सुपर-१२’ फेरीसाठी पात्र ठरतील. या १२ संघांची २ गटांत विभागणी केली आहे.

गतविजेते वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा पहिल्या गटात समावेश आहे. या गटात पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील. तसेच, दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यासह पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील.

Advertisement

पहिल्या फेरीत ८ संघ असून, त्यांचीही दोन गटात विभागणी केलीय. ‘अ’ गटात श्रीलंका, आयर्लंड, नामीबिया आणि नेदरलंड्स यांचा, तर ‘ब’ गटात ओमान, बांगलादेश, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा समावेश आहे.

विश्वचषकात आधी पहिल्या फेरीतील सामने होतील. नंतर ‘सुपर-१२’ च्या फेरीला सुरुवात होईल. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबुधाबीमधील शेख झायद स्टेडियम, शारजाहमधील शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी ग्राऊंड येथे हे सामने होणार आहेत. स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

टी-२० विश्वचषकासाठी संघांची गटवारी
पहिली फेरी
गट ‘अ’ – श्रीलंका, आयर्लंड, नामीबिया आणि नेदरलंड्स
गट ‘ब’ – ओमान, बांगलादेश, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी

सुपर १२ फेरी
पहिला गट – वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका, गट ‘अ’मधील अव्वल क्रमांकाचा संघ व गट ‘ब’ मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ.
दुसरा गट – भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट ‘अ’ मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ आणि गट ‘ब’ मधील अव्वल क्रमांकाचा संघ.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement