कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तरुणाची नसबंदी..! चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती, हा रंजक किस्सा जाणून घेण्यासाठी वाचा..!
कोरोना लसीकरण सुरु झाल्यापासून वेगवेगळे किस्से समोर येत आहेत. कधी एकाच व्यक्तिला दोन वेगवेगळ्या लसी दिल्या गेल्या, तर काहींना एकाच वेळी अनेकदा लस दिल्याचेही समोर आले. मात्र, उत्तर प्रदेशमधील एका घटनेने आरोग्य विभागात अक्षरश: खळबळ उडाली.
उत्तर प्रदेशमधील एटाह जिल्ह्यातील विशनपूर या गावात ही घटना घडली. कोरोना लस देण्याच्या नावाखाली एका मूकबधीर, अविवाहित तरुणाची चक्क नसबंदी केल्याचा आरोप आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आला. मात्र, त्यातील सत्य जेव्हा समोर आले, तेव्हा सगळेच हादरून गेले.
.. तर त्याचे झाले असे, की कोरोना लस घेतल्यास पैसे मिळतील, असे सांगून या विशनपूर येथील ४० वर्षीय ध्रुवकुमार या मूकबधीर तरुणाला आशासेविका घेऊन गेली होती. मात्र, कोरोनाच्या नावाखाली त्याची चक्क नसबंदी केल्याचा आरोप त्याच्या घरच्यांनी केला. त्यामुळे आरोग्य विभागात एकच गोंधळ उडाला.
ध्रवकुमारच्या घरच्यांनी थेट अवागड पोलिस ठाणे गाठले. ध्रुवकुमारचा भाऊ अशोककुमारने नीलम नावाच्या आशा सेविकेविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरवात करीत आरोग्य विभागाकडे या घटनेचा अहवाल मागितला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य खात्याने त्रिसदस्यीय समिती नेमली.
आरोग्य विभागाचे अधिकारी तातडीने चौकशीसाठी ध्रुवकुमारच्या गावी विशनपूर येथे पोचले असता, त्याच्या घरच्यांनी त्यास लपवून ठेवले. घरच्यांनी सांगितले, की ध्रुवकुमार मूकबधीर असून, त्याला ऐकू व बोलता येत नाही. मात्र, गावकऱ्यांनी त्याला ऐकू येते व तो लिहू शकत असल्याचे सांगितले.
आरोग्य समितीच्या तपासात वेगळाच ‘ट्विस्ट’ समोर आला. नसबंदी शस्रक्रियेच्या फाॅर्मवर स्वत: ध्रुवकुमारने सही केली होती. तसेच त्याला इशाऱ्याने विचारणा केली असता, त्याने आपल्याला ३ मुले असल्याचेही आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितले होते. शस्रक्रिया करतानाही त्याने कोणताही विरोध केला नसल्याचे समोर आले.
चौकशीत आशासेविका निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले. ध्रुवकुमारची नसबंदी त्याचा भाऊ, वहिनी व त्याच्या स्वत:च्या संमतीने झाल्याचे आशा सेविका नीलम यांनी सांगितले. संजू नावाच्या दलालाने त्यांना नसबंदी केल्यावर पैसे मिळणार असल्याचे आमिष दाखविले होते.
नंतर कोरोनाच्या नावाखाली नसबंदी केल्याबद्दल आशासेविकांवर फसवणुकीचा आरोप केल्यास लाखो रुपये मिळतील, असे त्याने सांगितले. त्यानुसार ध्रुवकुमारच्या घरच्यांनी २० हजार रुपयांत सेटलमेंट करू, अन्यथा तुम्हाला जेलमध्ये पाठविण्याची धमकी दिल्याचे नीलम यांनी सांगितले.