राज्य ‘अनलाॅक’ करण्याबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..! ‘एमपीएससी’ भरतीबाबतही ठरलं.. पाहा काय काय निर्णय घेतलेत..?
सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली असली; तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले.
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा झाली. गेल्या 3 आठवड्यापासून राज्यातील रुग्णसंख्या स्थिर आहे; पण अजूनही 10 जिल्ह्यांत 92 टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे अनेक जिल्हे लेव्हल- 3 मध्ये असल्याने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.
लशीचे दोन डोस घेतलेल्या व्यापाऱ्यांना दुकाने खुली ठेवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचेही टोपे म्हणाले.
टोपे म्हणाले, की “कोरोनाच्या तिसर्या लाटेचा इशारा देऊनही लोक खबरदारी घेत नसल्याचे दिसते. निर्बंध शिथिल केले की पर्यटनस्थळे, बाजारपेठ गजबजून जात आहे. कोरोना नियम पालन जात नसतील, तर पुन्हा कडक निर्बंध करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना सूचना दिल्या आहेत.”
कोरोना रुग्णांचा संख्या कमी झाल्याने पुढील आठवड्यांपासून राज्य टप्प्याटप्याने अनलॉक होणार असल्याची चर्चा होती, पण राज्य सरकारने कोणतेही निर्बंध हटविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णयही पुन्हा बारगळला आहे.
रेल्वे प्रवासी संघटना आणि सामान्य नागरिकांकडून लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी होत होती. मात्र, राज्य सरकारने सावध भूमिका घेताना तुर्तास लोकल सुरू करणार नसल्याचे स्पष्ट केलेय.
दरम्यान, बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी कोरोना लसीचे दोन डोस घेतले असतील, तरच राज्यात प्रवेश देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविले
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी अजून एक हजार डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे. आठवडाभरात त्याची जाहिरात निघेल. वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षांपर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली.
एमपीएससीमार्फत 15 हजार पदभरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १५ हजार ५११ पदे भरणार. गट ‘अ’ ४४१७, गट ‘ब’ ८ हजार ३१, तर गट ‘क’मधील ३0६३, अशी एकूण १५,५११ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांचे आरक्षण तपासून पदभरती राबविण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच UPSC च्या धर्तीवर MPSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार.