मृत आत्म्यांशी संवाद साधण्याचा अघोरी प्रकार उघड, स्मशानभूमी मांत्रिकांच्या मंत्रोपच्चारांनी दणाणली.. पुढं काय घडलं जाणून घेण्यासाठी वाचा…
माणूस कितीही शिकला, सुशिक्षित झाला, तरी त्याची श्रद्धा काही कमी झालेली नाही. मात्र, कधीकधी याच श्रद्धेचे अंधश्रद्धेत रुपांतर होते नि त्या नादात माणूस मागचा-पुढचा कोणताही विचार न करता, भलतेच काहीतरी करुन बसतो..!
अंधश्रद्धेचा असाच एक अघोरी प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे घडला. गावातील व्यावसायिक आशिष गोठी या तरुणाच्या वडिलांचे व भावाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी, यासाठी या तरुणाने छत्तीसगडमधून तीन मांत्रिकांना पाचारण केले.
मलकापूर येथील माता महाकाली परिसरातील स्मशानभूमित दिव्यांची आरास करण्यात आली. रोज अंधारात बुडणारी स्मशानभूमी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली. त्यानंतर काळ्या कपड्यातील मांत्रिकांनी स्मशानभूमीत मंत्रोपच्चार सुरु केले.
तरुणाचे वडील व भावाच्या मृत आत्म्यांना जागृत करून त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे हे मांत्रिक दाखवित होते. तब्बल दोन तास हा अघोरी प्रकार सुरु होता.
कोरोना संसर्गामुळे बुलडाण्यात मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर स्मशानशांतता असते. सगळीकडे सामसूम झालेली असताना, किर्रर्र अंधाऱ्या रात्री मलकापूरच्या स्मशानभूमीची शांतता भंग पावली.
मलकापूरच्या स्मशानभूमीत मोठ्या आवाजात मंत्राचा गजर सुरू होता. रात्रीची शांतता भेदत हा आवाज गावभर झाला. लोकांच्या कानोकानी झाला. बघता-बघता गावभर वाऱ्यासारखी बातमी पसरली. स्मशानभूमीत नेमकं काय चाललंय, हे पाहण्यासाठी लोकांनी स्मशानभूमी गाठली. तेथील दृश्य पाहून अंगाचा थरकाप उडाला.
स्मशानभूमीत मंत्र-तंत्राचा वापर करीत 3 मांत्रिक मृत आत्म्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे घाबरुन कोणीही हा प्रकार थांबविण्यासाठी पुढे झाले नाही. त्यानंतर कोणीतरी मलकापूर पोलिसांना कळविले.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर जाऊन हा सगळा प्रकार थांबविला. तीन मांत्रिकांसह आशिष गोठी यालाही ताब्यात घेण्यात आले. या सगळ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नागरी वस्तीला लागून असलेल्या स्मशानभूमितील या अघोरी प्रकारामुळे स्थानिक रहिवाशी चांगलेच भयभीत झाले आहेत.