SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सेल्फीचा नाद अंगलट.. तरुण 800 फूट खोल दरीत कोसळला, पाहा पुढे काय घडलं..?

हातात मोबाइल आल्यापासून अनेकांना सेल्फीचे एकप्रकारे व्यसनच लागलेय. सेल्फीच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावला, तरी त्यातून धडा घेतला जात नाही. दुर्गम, जीवघेण्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचे प्रकार सुरूच आहेत.

असाच एक प्रकार साताऱ्यात घडला. कास पठार रस्त्यालगत कठड्यावर उभा राहून सेल्फी काढताना तोल गेल्याने एक युवक तब्बल 800 फूट खोल दरीत कोसळला. पण दैव बलवत्तर असल्याने तब्बल 24 तासांनंतर अथक प्रयत्नातून या तरुणाला दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Advertisement

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. तनिष्क जांगळे (वय 24, रा. सातारा) असे या दरीत पडलेल्या युवकाचे नाव आहे.

कास पठारावर फिरण्यासाठी गुरुवारी (ता.8) तनिष्क जांगळे ही युवक एकटाच दुचाकीवरुन गेला होता. गणेश खिंड येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोबाईलमध्ये सेल्फी काढताना तोल जाऊन तो 800 फूट खोल दरीत कोसळला.

Advertisement

मात्र, तनिष्कच्या सोबत कोणीही नसल्याने हा प्रकार कोणालाच लवकर समजला नाही. रस्त्यालगत बराच वेळ एक दुचाकी उभी असल्याचे तेथील स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आले. कोणीतरी दरीत पडले असावे, असा संशय आल्याने त्यांनी छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला याबाबत माहिती दिली.

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या ट्रेकर्सनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर तब्बल 24 तासांनी तनिष्कला दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तब्बल 800 फूट दरीत कोसळल्यामुळे तनिष्कला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून, त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Advertisement

सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. तनिष्कला सुखरुप बाहेर काढणाऱ्या छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीममधील विक्रम पवार, चंद्रसेन पवार, देवा गुरव, सौरभ जगताप, आदित्य पवार, मुकुंद पवार, ऋषी रंकाळे, संज्योग पडवळ, अभिजित शेलार यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/Spreadit

Advertisement