वडाखाली भरत होता शेअर बाजार..! ‘दलाल स्ट्रीट’ नावामागे आहे रंजक कहाणी, असा आहे भारतीय शेअर बाजाराचा इतिहास..
मुंबई शेअर बाजार, अर्थात ‘बीएसई’च्या स्थापनेला आज 146 वर्षे पूर्ण होत आहेत. या शेअर बाजाराच्या स्थापनेची कहाणी फार रंजक आहे. तसेच मुंबईतील रस्त्याला ‘दलाल स्ट्रीट’ हे नाव कसे पडले, यामागेही रंजक किस्सा आहे.
भारतात राष्ट्रीय शेअर बाजार (National Stock Exchange) आणि मुंबई शेअर बाजार (Bombay Stock Exchange) असे दोन प्रमुख ‘स्टॉक एक्सचेंज’ आहेत. पैकी ‘बीएसई’ हा आशिया खंडातील सर्वांत जुना शेअर बाजार असून, सध्या मुंबईतील ‘दलाल स्ट्रीट’वर ‘बीएसई’ची इमारत आहे. इथंच रोज पैशांचा खेळ भरतो. त्यात काही मालामाल होतात, तर काही कंगाल..!
वडाखाली झाली सुरवात..
मुंबईतील हार्निमन सर्कलजवळील टाउनहॉलजवळील एका वडाच्या झाडाखाली 1840 मध्ये दलाल उभे राहून शेअर्सचे व्यवहार करीत. आतासारखे डिजिटल शेअर्स नसल्याने सगळे व्यवहार कागदपत्रांच्या स्वरूपात होत. या दलालांनी एकत्र येऊन 9 जुलै 1875 एका संघटनेची स्थापना केली.
‘नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन’ असे या संघटनेला नाव दिले. त्याचेच पुढे 1875 मध्ये ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’मध्ये रुपांतर झाले. 1874 मध्ये या शेअर बाजाराला नवी जागा मिळाली. मात्र, वडाखाली उभे राहून दलाल व्यवहार करीत असल्याने, या रस्त्यालाच लोक ‘दलाल स्ट्रीट’ या नावाने ओळखू लागले.
1860 च्या दशकात मुंबई परिसरात सुमारे 250 शेअर दलाल कार्यरत होते; पण 1865 मध्ये अमेरिकेतील युद्धानंतर तेथून भारतात होणारी गुंतवणूक कमी झाली. दलालांना काही कामच राहिले नाही. शेअरच्या किमती कोसळल्या.
जुलै 1875 मध्ये 1 रुपया प्रवेशशुल्क भरून 318 जणांनी ‘नेटिव्ह अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन’ सुरू केली. बाजार भरवण्यासाठी इमारत बांधण्यापासून दलालांच्या हितांसाठी या संघटनेने काम सुरू केले. 1887 मध्ये त्याला एक निश्चित दिशा मिळाली नि तेव्हापासून ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ने मागे वळून पाहिले नाही.
मुंबईतला शेअर बाजार अधिक चांगल्या पद्धतीने चालावा, यासाठी 18 जानेवारी 1899 ला ब्रिटिश अधिकारी जे. एम. मेक्लिन यांनी स्थानिक शेअर दलालांना सन्मानाचे स्थान देण्याचा प्रयत्न केला. हा त्या काळातला भारतातला सगळ्यात मोठा गुंतवणूक बाजार होता.
भारत स्वतंत्र्य झाल्यावर 1956 मध्ये ‘सिक्युरिटी कॉन्ट्रक्ट रेग्युलेशन अॅक्ट’च्या माध्यमातून ‘बीएसई’ला भारत सरकारने अधिकृत मान्यता दिली. ‘बीएसई’चा ‘सूचकांक’ म्हणजेच ‘बीएसई सेन्सेक्स’ हा 1986 मध्ये तयार झाला. 1990 च्या दशकात कॉम्प्युटर आला. याच काळात शेअर बाजारात अनेक घोटाळेही झाले. त्यामुळे नवे नियम करण्यात आले, स्टॉक एक्सचेंजचा विस्तार झाला.
1995 मध्ये केवळ 50 दिवसांत ‘बीएसई’त ‘इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टिम’ स्वीकारली गेली आणि ‘बीएसई ऑन लाइट ट्रेडिंग’ (BOLT)ची सुरुवात झाली. त्यात दिवसाला 80 लाख ट्रेड करता येतात. जगात पहिल्यांदा ‘बीएसई’मध्ये ‘सेंट्रलाइज्ड इंटरनेट ट्रेडिंग सिस्टिम’ सुरू करण्यात आली.