आईचा खून करुन काळीज भाजून खाणाऱ्या विकृत मुलाला फाशीची शिक्षा, कोल्हापूरच्या इतिहासातील पहिलीच घटना..!
आईचे काळीज कापून खाणाऱ्या दिवट्या नराधम मुलाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात ही पहिलीच फाशीची शिक्षा ठरली आहे.
सुनील रामा कूचकोरवी, असे या क्रूर, निष्ठूर मुलाचे नाव आहे. कोल्हापूर शहरातील माकडवाला वसाहतीत 28 ऑगस्ट 2017 रोजी अंगाचा थरकाप उडवणारी ही दुर्दैवी घटना घडली होती. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून आरोपी सुनीलने आई यल्लवा कुचकोरवी यांची धारदार शस्राने निर्घृणपणे हत्या केली होती.
नराधम सुनीलने आईच्या खुनानंतर तिच्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे करुन ते फ्रिजमध्ये भरून ठेवले. एवढ्यावरच त्याचा विकृतपणा थांबला नाही, तर चक्क आईचं काळीज कापून ते भाजून खाण्याचा प्रयत्नदेखील त्याने केला होता.
याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात आईची हत्या केल्याचा गुन्हा नराधम सुनील याच्याविरोधात दाखल झाला. आईच्या शरीराचे तुकडे भाजून खात असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या.
तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी या गुन्हाचा तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. कोल्हापूरचे जिल्हा न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. अत्यंत क्रूरपणे झालेल्या या खुनाच्या खटल्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
विकृत सुनीलला जन्मठेप द्यायची की फाशी, याबाबत सरकारी व आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने निकाल दिला. सुनीलने केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे व घृणास्पद आहे. ही अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने नराधम सुनील यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, तसेच त्याला 25 हजार रुपये दंड केला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच फाशीची शिक्षा ठरली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली.
दरम्यान, आरोपी सुनीलला शिक्षा सुनावल्यानंतर कारागृहाकडे घेऊन जाताना, त्याचे चित्रीकरण करणार्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना आरोपीच्या नातेवाईकांनी शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचे पोलिस निरीक्षक आणि तपास अधिकारी संजय मोरे यांनी सांगितले.