चौघींसोबत संसार, 53 जणींना लग्नाची मागणी..! पुण्यातील ‘सखाराम बाइंडर’ची अनाेखी कहाणी, तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुटले..
प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाईंडर’ नाटक आपल्या पैकी अनेकांना माहित असेल. अशाच एका ‘सखाराम बाईंडर’ला पुणे पोलिसांनी नुकतेच अटक केले. तब्बल 57 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या या ‘सखाराम’ची कहाणी ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत.
योगेश दत्तू गायकवाड, असं या आधुनिक ‘सखाराम’चे नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील तो मूळ रहिवाशी.. मात्र मागील काही दिवसांपासून हा योगेश पुण्यात फिरत होता. बसस्थानकावर एकट्या-दुकट्या तरुणींना हेरून तो त्यांच्याजवळ जात असे. गोडगोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करीत असे.
तरुणींचा मोबाईल नंबर घेऊन समाजमाध्यमातून त्यांच्याशी ओळख वाढवायचा नि हळूहळू आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा.. त्यांना लग्नाचे आमिष दाखवायचा. मुलींच्या कुटुंबातील एखाद्याला लष्करात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून 2-3 लाखांना लुटायचा. त्याचा हा आता नित्याचा धंदाच झाला होता.
जानेवारी 2020 मध्ये आळंदी देवाची येथे फिरत असताना योगेशचे आधारकार्ड खाली पडले (की पाडले). तेथील एका तरुणीला ते सापडले. तिने हाक मारुन योगेशला ते आधारकार्ड परत दिले.
झालं.. ओळख करण्यासाठी योगेशला कारण सापडले. आपण लष्करात मोठ्या हुद्द्यावर असल्याचं खोटं ओळखपत्र दाखवून त्याने संबंधित तरुणी व तिच्या आईचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तिच्याशी लग्नही केलं. तिच्या भावाला लष्करात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 2 लाख रुपये घेतले.
पैसे मिळताच मात्र तो परागंदा झाला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पीडित तरुणीच्या लक्षात आले. तिने तडक बिबवेवाडी पोलिस ठाणे गाठले. योगेशच्या विरोधात तक्रार दाखल केली. बऱ्याच दिवसांच्या तपासानंतर अखेर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
चौकशीत त्यानं जे सांगितले, ते ऐकून पोलिसही चक्रावून गेले. आरोपी योगेशने अशाच प्रकारे पुण्यातील तब्बल 57 तरुणींना गंडा घातल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, त्यातील चार तरुणींसोबत लग्न करुन त्यानं संसारही थाटल्याचंही समोर आलं.
सध्या त्याची 53 तरुणींसोबत लग्नाची बोलणी सुरू होती. संबंधित 53 तरुणींना प्रत्येकी 1 लाख रुपयांना त्याने गंडा घातल्याचे समोर आले आहे. बिबवेवाडी पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.