दिलासादायक.. ! इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.. ‘मेस्टा’ संघटनेचा मोठा निर्णय; जाणून घेण्यासाठी वाचा..!
शिक्षण क्षेत्रासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. हा दिलासा आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी..!
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोशिएशन, अर्थात ‘मेस्टा’ (MESTA) ही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संघटना आहे. या संघटनेने राज्यातल्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे 25 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलाय.
तसेच, कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्याचे संपूर्ण शिक्षण मोफत करणार असल्याचेही ‘मेस्टा’ने जाहीर केले आहे.
राज्यातील 18 हजार इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना ‘मेस्टा’च्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे ऊद्याेग-धंदे बंद पडले. त्यामुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडले होते.
खासगी शाळांची फी भरणेही अनेकांसाठी मुश्किल झाले होते. दुसरीकडे पालकांनी शुल्क न भरल्याने इंग्रजी शाळा चालवणेही अवघड झाले आहे. अशा संकट काळात राज्यातल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अखेर 25 टक्के शुल्क कपात केली आहे.
इंग्रजी शाळांच्या ‘मेस्टा’ संघटनेने हा निर्णय जाहीर करतानाच, कोरोना संकटात दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षणही मोफत करण्याचा महत्वाचा निर्णय जाहीर केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने खासगी शाळांना त्यांच्या शालेय शुल्कात 15 टक्के कपात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, ‘मेस्टा’ने चक्क फीमध्ये 25 टक्के कपात केल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे मागील वर्षभरापासून विदयार्थ्यांनी शाळांचे तोंडही पाहिलेले नाही. सरकारी शाळांना त्याचा फारसा फरक पडत नसला, तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळा अडचणीत आल्या आहेत. शिक्षकांचे पगार, शाळेचा नियमित खर्च कसा करावा, असा प्रश्न शाळांना पडलेला आहे.
काही शाळांनी फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासमधून बाहेर काढल्याने मोठा गोंधळ झाला होता. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांनी फी कपात करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.