किलोभर भाजीची किंमत किती असू शकते, फारतर 100 वा 200 रुपये..! पण जगात एक अशी भाजी आहे, की एक किलोभर घ्यायची म्हटली, तर वर्षाचे बजेट लागेल… म्हणजे या भाजीच्या किमतीत तुम्ही चांगली टू-व्हीलर किंवा चक्क 2 तोळे सोने विकत घेऊ शकता..!
..तर या भाजीचे नाव आहे, ‘हॉप शूट्स’.. आणि तिची किंमत आहे, तब्बल 80 हजार ते 1 लाख रुपये किलो..!इतकी महाग भाजी कोण खाणार, असं तुम्हाला वाटत असेल, तर थांबा.. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात ‘हाॅप शूट्स’ला मोठी मागणी आहे. पण ती तुम्हाला रस्त्यावर नाही मिळू शकत, त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करावी लागते..
जगभरातील काही मोजक्याच देशांमध्ये ‘हॉप शूट्स’चं उत्पादन होतं. त्यात आपल्या भारताचाही समावेश आहे बरं का..! वाराणसीतील ‘इंडियन व्हेजिटेबल रिसर्च इंस्टीट्यूट’मध्ये या ‘हॉप शूट्स’ची लागवड केली जाते. अमेरिकेत सर्वात जास्त, तर जर्मनी या भाजीच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वप्रथम आठव्या शतकात जर्मनीतच या भाजीचे उत्पादन घेतल्याचा उल्लेख आहे. इंग्लंडमध्ये सोळाव्या शतकापर्यंत या भाजीवर प्रतिबंध घातले होते. जर्मनीत ही भाजी टॅक्समुक्त करण्यात आली होती. यावरून या भाजीचा इतिहास खूप जुना असल्याचे लक्षात येतं.
‘या’ आजारांवर ‘हॉप शूट्स’ गुणकारी..
कॅन्सरच्या पेशी रोखण्यासाठी ‘हॉप शूट्स’ खूपच फायदेशीर आहे. चिंता, हायपरॅक्टिव्हिटी, शरीरावरील वेदना, अस्वस्थता, लैंगिक संसर्ग, धक्का, तणाव, दातदुखी, अल्सर, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांवर ही भाजी फार गुणकारी आहे. केसांमधील कोंडादेखील ती दूर करते. भाजीच्या फळांचा, फुलांचा आणि मुळांचा देखील वापर केला जातो.
बटर किंवा विविध सॉसबरोबर ही भाजी खाल्ली जाते. यीस्ट, कँडी आणि जिलेटिनमध्ये तिचा वापर होतो. शिवाय आईस्क्रीम, पुडिंग, बेक फूड, च्युइंगममध्ये देखील ती वापरली जाते. ‘हॉप शूट्स’चं तेलही काढले जाते.
बिअर तयार करण्यासाठी आणि औषधी उद्याेगांमध्ये अँटिबायोटिक तयार करण्यासाठी देखील या भाजीचा वापर होतो. या झाडाच्या मुळांपासून बनवलेले औषध टीबी उपचारात उपयोगी ठरते. ‘हॉप शूट’च्या फुलांना ‘हॉप कोन’ असेही म्हणतात. भाजीचे कोंब वेगवेगळ्या प्रकारे खाल्ले जातात.