मोदी सरकारविरुद्ध बॉलिवूड एकवटले..! केंद्राच्या ‘या’ कायद्याला 1400 सेलिब्रेटींचा विरोध, पहा नेमकं काय आहे कारण..?
वाढती महागाई, शेतकरी व कामगार कायदे, पेट्रोल-डिझेल, गॅसचे सातत्याने वाढणारे भाव, यामुळे मोदी सरकारविरुद्ध टीका होत असताना, त्यात आता बॉलिवूडची (Bollywood) भर पडलीय. मोदी सरकारविरोधात (Modi sarkar) अवघे बॉलिवूड एकवटले आहे.
त्यासाठी निमित्त ठरले आहे, मोदी सरकारचा एक निर्णय. तो म्हणजे, मोदी सरकार चित्रपटाच्या सेन्सॉर बोर्डाच्या नियमांत काही बदल करणार आहे. या नव्या नियमांनुसार सेन्सॉर बोर्डाने (censor Board) चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रद्द करण्याचा अथवा त्यावर पुनर्विचार करायला लावण्याचा हक्क केंद्र सरकारला मिळणार आहे.
मोदी सरकारच्या याच धोरणाला बॉलिवूडमधून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यासाठी अनुराग कश्यप, फरहान अख्तर, सुधीर मिश्रा यांच्यासह 1400 सेलिब्रेटींनी थेट माहिती व प्रसारण मंत्रालयाला ऑनलाईन पत्र पाठविले आहे.
मोदी सरकार ‘सिनेमॅटोग्राफ कायदा-1952’मध्ये काही बदल करणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ‘सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक-2021’ आणले आहे. या विधेयकावर सरकारने 2 जुलैपर्यंत सामान्यांच्या प्रतिक्रिया मागविल्या होत्या.
दरम्यान, सरकारच्या या कायद्याला बॉलिवूडसह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील कलाकारांनीही जोरदार विरोध केला आहे. अनेक सेलिब्रिटीजनी सोशल मीडियातून या निर्णयावर टीका केलीय, तर काही निर्मात्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागतही केले आहे. बडय़ा प्रॉडक्शन हाऊसने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बॉलिवूडचा विरोध कशामुळे..?
केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळाल्यास, चित्रपट रिलीज झाल्यानंतरही निर्मात्यांवर कायम टांगती तलवार असेल, अशी भीती प्रोडय़ुसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे सीईओ नितीन तेज आहुजा यांनी व्यक्त केली.
सेन्सॉर बोर्डावर विश्वास नाही का..?
दिग्दर्शक सुधीर मिश्रा म्हणाले, की “चित्रपट पाहायचा की नाही, हा निर्णय सर्वस्वी प्रेक्षकांचा असतो. प्रेक्षकांच्या घरात घुसून, कोणी त्यांना जबरदस्ती करीत नाही. चित्रपटातील काही गोष्टी न पटल्यास चित्रपट पाहू नका किंवा त्याविरोधात कोर्टात जाता येते; मग ही नवी नियमावली कशासाठी? याचा अर्थ सरकारला स्वतःची संस्था सेन्सॉर बोर्डावर विश्वास नाही का?”