ड्रोनहल्ला कसा केला जातो? तो कसा रोखायचा..? भारताकडे काय यंत्रणा आहे, जाणून घेण्यासाठी वाचा..!
दहशतवाद्यांनी जम्मूच्या हवाई तळावर ड्रोन्सद्वारे बाॅम्बस्फोट घडवून आणले. त्यानंतर सलग चार दिवस (ता. २७ ते ३० जून) या भागात ड्रोन्स फिरताना दिसले. ते वेळीच लक्षात आल्यावर भारतीय जवानांनी गोळीबार करीत त्यांना पिटाळून लावले. मात्र, यानिमित्ताने भारताला ड्रोनविरोधी यंत्रणेची गरज असल्याचे ठळकपणे समोर आले.
अशाप्रकारे हल्ला करण्यासाठी कधी, कुठे ड्रोन्सचा वापर झालाय का? त्यापासून बचाव करण्यासाठी काय यंत्रणा आहे? ती कसे काम करते? त्यासाठी किती खर्च येतो आणि भारतापुढे काय पर्याय आहेत? याबाबत जाणून घेऊ या…
दहशतवाद्यांनी भारतावर केलेला असा पहिलाच हल्ला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये येमेनमधील हौथी बंडखोरांनी ड्रोनच्या साहाय्याने सौदी अरेबियातील दोन तेलसाठ्यांवर हल्ले केले होते. मध्य-पूर्व आशियात, विशेषत: इराक, सिरियामध्ये युद्धादरम्यान ड्रोन्स वापरले जात असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात २०२० मध्ये इराणी जनरल कासीम सुलेमानीला इराकमध्ये ठार करण्यात आलं होतं. २०१८ मध्ये व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मॅड्रो यांनीही आपल्यावर अशाच प्रकारे प्राणघातक हल्ला झाल्याचा दावा केला होता.
कोणाकडे आहे ड्रोन हल्ला रोखणारी यंत्रणा.?
ड्रोन हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी काही खासगी कंपन्या सेवा पुरवितात. इस्रायल, अमेरिका आणि चीनमधील काही कंपन्यांनी ड्रोनविरोधी तंत्रज्ञान तयार केलंय. रडार, फ्रिक्वेन्सी जॅमर, ऑप्टिक आणि थर्मल सेन्सर याच्या मदतीने ड्रोनविरोधी यंत्रणा तयार केली आहे.
फ्रान्समधील ‘राफेल’ कंपनीची ‘ड्रोन डोम’ यंत्रणा ड्रोन्सला हवेतच नष्ट करते. स्टॅटीस्टीक रडार्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी सेन्सर्स आणि कॅमेराच्या मदतीने ३६० अंशांतील माहिती हे ड्रोन डोम देते. तसेच नियंत्रकाकडून ड्रोनला पाठविण्यात येणारे संदेशही ते अडवते. परिणामी, ड्रोन आपोआप निकामी होतो. ‘हाय पॉवर लेझर बिन्स’च्या साहाय्याने हे ड्रोन्स पाडले जातात.
अमेरिकेतील ‘फोर्टीम टेक्नोलॉजी’ कंपनीचा ‘ड्रोन हंटर’ यंत्रणा आहे, तर ऑस्ट्रेलियातील ‘ड्रोनशिल्ड’ कंपनीची यंत्रणा ड्रोन गन्स पुरविते. मात्र, कोणत्याही कंपनीने ड्रोन विरोधी यंत्रणेची किंमत जाहीर केलेली नाही. किती ठिकाणांचे संरक्षण करायचंय, त्यासाठी लागणारी यंत्रणा, त्यावर ड्रोनची किंमत ठरते.
भारताकडे काय पर्याय..?
भारताच्या ‘डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (डीआरडीओ)ने ‘अँण्टी ड्रोन सिस्टीम’ तयार केली आहे. लवकरच त्याचा वापर केला जाणार आहे. २०२० मध्ये अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला भेट दिली, तेव्हा या यंत्रणेचा वापर करण्यात आला होता.
जम्मूतील हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ला झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक घेतली. ड्रोनमार्फत होणारे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक सामग्री खरेदी करण्यास तीनही दलांना सांगण्यात आले.