पाकिस्तानचा भारतावर ड्रोन हल्ला..? जम्मूतील एअरफोर्स स्टेशन निशाण्यावर, पाहा बाॅम्बस्फोटात किती नुकसान झालेय..?
जम्मू-काश्मीरमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या तयारीत मोदी सरकार असताना, जम्मूतल्या एअरफोर्स स्टेशनवर शनिवारी (ता. 26) मध्यरात्री दोन छोटे बाॅम्बस्फोट झाले. ड्रोनच्या साहाय्याने दहशतवाद्यांनी हे बाॅम्बस्फोट केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
दरम्यान, घटनास्थळी फॉरेन्सिक टीम व एक्सपर्ट पोहोचले असून, दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी वायू दलाचे चीफ एअर मार्शल एच. एस. अरोरा यांच्याकडून घटनेची माहिती घेतली.
जम्मूतील एअरफोर्स स्टेशनवर शनिवारी मध्यरात्री पाच मिनिटाच्या फरकानं दोन बाॅम्बस्फोट झाले. त्याची तीव्रता कमी असली, तरी ज्या पद्धतीने हे स्फोट झाले, ते मात्र गंभीर आहे. एअर फोर्सच्या इमारतीवर 1 वाजून 37 मिनिटांनी पहिला, तर दुसरा स्फोट 1 वाजून 42 मिनिटांनी मोकळ्या जागेत झाला.
स्फोटात एअरफोर्स स्टेशनवरील दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत. नंतर सुरक्षा जवानांनी संपूर्ण भागातील सुरक्षा अधिक कडक केली. येथील कुठल्याही उपकरणांना वा विमानांना हानी पोचलेली नाही. स्फोटके वाहून नेण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याचा संशय आहे.
भारत-पाक बॉर्डर जम्मू एअरफोर्स स्टेशनपासून 14 किलोमीटरवर आहे. ड्रोनच्या साहाय्याने 12 किलोमीटरपर्यंत असा हल्ला करता येतो आणि ड्रोन सहसा रडारवर येत नाहीत. त्यामुळेही हा हल्ला लक्षात आले नसल्याचे समजले.
हल्लेखोरांच्या निशाण्यावर एअरफोर्सची विमाने होती. प्रत्यक्षात तेथील कुठल्याही विमानाचे नुकसान झाले नाही. या हल्ल्यानंतर पठाणकोट, अंबाला, अवंतीपुरा येथील एअरबेसवरही ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, आकाशातून स्फोटके पडताना एअर फोर्सच्या पेट्रोलिंग टीमने पाहिले होते. त्यामुळेच हा ड्रोन हल्ला होता, यावरच भर दिला जात आहे. त्यावर शिक्कामोर्तब झाल्यास ड्रोनने झालेला हा देशातील पहिला हल्ला असेल. यापूर्वी असा हल्ला देशाच्या कुठल्याही सुरक्षास्थळांवर झालेला नाही.