भारताच्या राष्ट्रपतींनाही पगार पुरेना..! शिक्षकांना चांगला पगार, पण… राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काय खंत व्यक्त केलीय पाहा..?
पगार पुरत नसल्याची ओरड प्रत्येक जणच करीत असतो. मात्र, आता चक्क भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही आपल्या अपुऱ्या पगाराबाबत खंत व्यक्त केलीय..!
राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर रामनाथ कोविंद प्रथमच कानपूर जिल्ह्यातील त्यांच्या परौंख या गावी गेले होते. तब्बल 15 वर्षांनंतर राष्ट्रपती पदावरील व्यक्तीने असा रेल्वेप्रवास केला. यापूर्वी 2006 मध्ये तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी विशेष रेल्वेने दिल्ली ते देहरादून असा प्रवास केला होता.
…तर कानपूरच्या देहात जिल्ह्यातील झिझक रेल्वेस्टेशनवर काल (शुक्रवारी) सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पोहचले. झिझक रेल्वेस्टेशनवरील आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
राष्ट्रपती कोविंद म्हणाले, की “मी खासदार असताना, झिझक रेल्वेस्टेशनवर अनेक ट्रेन्स थांबत, नंतर त्या बंद झाल्या. कदाचित कोरोनामुळे त्या बंद झाल्या असाव्यात. मात्र, लवकरच येथे पुन्हा सर्व ट्रेन्सला थांबा मिळेल.”
आपल्या पगाराबाबत खंत व्यक्त करताना ते म्हणाले, की “देशात सर्वात जास्त पगार राष्ट्रपतींना मिळतो. आम्हाला 5 लाख रुपये पगार आहे, ज्यातील पावणे तीन लाख रुपये तर कर भरण्यातच जातात. मग वाचले किती? आणि जितके वाचले, त्यापेक्षा जास्त पगार तर आमच्या अधिकाऱ्यांना, अन्य लोकांनाही मिळतो. या ठिकाणी काही शिक्षक बसलेत, त्यांनाही सर्वाधिक पगार आहे.”
दरम्यान, राष्ट्रपती कोविंद यांच्या सन्मानार्थ 27 जून रोजी त्यांच्या मूळ गावी परौंख व कस्बा पुखराया येथे कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 28 जून रोजी विशेष ट्रेनने ते लखनऊला रवाना होतील. 29 जून रोजी सायंकाळी हवाई दलाच्या विमानाने ते दिल्लीला पोहोचतील.