SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘सात जन्मच काय, सात सेकंदही बायको नको..’! पुरुषांनी साजरी केली पिंपळ पौर्णिमा, पाहा कुठे घडलाय हा अजब प्रकार..?

आज वटपौर्णिमा.. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करीत महिलांनी वडाला प्रदक्षिणा मारत साकडे घातले. दुसरीकडे ‘सात जन्मच काय, आम्हाला सात सेकंदही बायको नको..’ अशा घोषणा देत पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

औरंगाबादमधील वाळूंज परिसरात हा प्रकार घडला. वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पत्नीपीडित संघटनेचे सदस्य, तसेच पत्नीपीडित पतींनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. आम्हाला कधीच पत्नी नको, अशी प्रार्थना करीत या पुरुषांनी पिंपळाला उलट्या 108 फेऱ्या (प्रदक्षिणा) मारल्या.

Advertisement

वटपौर्णिमेला सुवासिनी महिला वडाचे पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी वडाला साकडे घालतात. मात्र, हे जर खरे असेल, तर वडाऐवजी पिंपळाची पूजा करून बायकोपासून सुटका व्हावी, यासाठी पुरुषांनी पिंपळ पूजन केले.

Advertisement

लग्न न झालेल्या व्यक्तीसाठी पिंपळाचे झाड हे प्रतिक मानले जाते. त्यामुळे ‘आम्ही पिंपळाला 108 उलट्या प्रदक्षिणा घालून, त्याची पूजा करून बायकोपासून सुटका व्हावी, अशी विनवणी केली..’ असे पत्नीपीडित पुरुषांनी सांगितले.

राज्यभरातील पत्नीपीडित नवऱ्यासाठी औरंगाबाद शहरात 2017 पासून पत्नीपीडित संघटना काम करतेय. वाळूज परिसरात या पुरुषांच्या निवासासाठी ‘पत्नीपीडित आश्रम’ सुरू केलेला आहे. आतापर्यंत येथे राज्यभरातील जवळपास 9 हजार पत्नीपीडित पुरुषांनी नोंदणी केली आहे.

Advertisement

घरातून हाकलून दिलेले पुरुष या आश्रमात राहतात. बायकोच्या जाचामुळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्या जाचातून सुटका होण्यासाठी अनेक पीडित पुरुष न्यायालयीन लढा देत आहेत. या पुरुषांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्नीपीडित आश्रमाच्या माध्यमातून मदत केली जाते.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement