कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने मजबूत भारताला 8 गड्यांनी पराभूत केलं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे( World Test Championship) विजेतेपद पटकाण्याचा मान मिळवला.
सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे वाया गेला. नाणेफेक जिंकलेल्या न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्या डावात (1st Inning) भारताला 217 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांवर आटोपला.
भारताचा दुसरा डाव 170 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारताकडून फक्त ऋषभ पंतने सर्वाधिक 41 धावा (Rishabh Pant – 41 Runs) केल्या. मग न्यूझीलंडसमोर विजयासाठी भारताने 139 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
भारतीय संघाने न्यूझीलंडला दिले 139 धावांचे टार्गेट: टॉम लेथम आणि डेवोनो कॉनवे ही न्यूझीलंडची सलामीची जोडी स्वस्तात बाद झाली. लॅथम 9 धावा करुन बाद झाला. त्यानंतर डेव्हॉन कॉन्वे 19 धावांवर बाद झाला. आर अश्विनने दोघांनाही बाद केलं; पण त्यानंतर अनुभवी रॉस टेलर आणि कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) संयमी फलंदाजी करत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
अनुभवी फलंदाजीचा मारा: रॉस टेलरने ( Ross Taylor) विजयी चौकार खेचत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. विल्यमसनने 8 चौकारांसह नाबाद 52 तर टेलरने 6 चौकारांसह 47 धावांची मौल्यवान खेळी केली. न्यूझीलंडने 2 विकेट गमावून 140 धावा काढून सामना खिशात घातला.
न्यूझीलंडची गोलंदाजी: पहिल्या डावात काईल जेमिसनने 5, वॅगेनर, बोल्टने प्रत्येकी 2 आणि टीम साऊथीने 1 विकेट घेतला. तर दुसऱ्या डावांत टीम साऊथीने 4, बोल्टने 3, जेमिसनने 2 आणि वेगनरने एक विकेट मिळवला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणाऱ्या न्यूझीलंडच्या काईल जेमीसनला सामनावीर (Man of The Match) पुरस्काराने गौरवण्यात आले.
न्यूझीलंड टीमला ‘इतक्या’ कोटींचं बक्षीस..
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या न्यूझीलंड संघाला बक्षीस रक्कम म्हणून 1.6 लाख अमेरिकन डॉलर्स मिळणार आहे. म्हणजे भारतीय चलनात ही रक्कम 11.72 कोटी आहे. शिवाय न्यूझीलंड संघाने चॅम्पियनशिपची गदाही पटकावली आहे, तर उपविजेत्या भारतीय संघाला 5.85 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.