पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारला सतत जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार पुढील 8 ते 10 दिवसांत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आता वाहनांसाठी ‘फ्लेक्स फ्युएल इंजिन’ (Flex-fuel Engine) अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘रोटरी संमेलन 2020-21’मध्ये सहभागी झालेल्या गडकरी यांनी ऑनलाईन (Online) संवाद साधताना याबाबत माहिती दिली.
देशातील वाहनांमध्ये ‘फ्लेक्स-फ्ल्यूएल इंजिन’ बसविण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे या वाहनांमध्ये इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करता येईल. देशात सध्या बहुतांश ठिकाणी पेट्रोल(petrol)च्या दराने शंभरी ओलांडली आहे.
इथेनॉलची किंमत 60 ते 62 रुपये प्रतिलिटर असते. वाहनांमध्ये इंधन म्हणून इथेनॉलचा वापर सुरु झाल्यास नागरिकांचे लिटरमागे 30 ते 35 रुपये वाचतील. भारतीय शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होऊन अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
आता केवळ पेट्रोल-डिझेल इंजिनच्या गाड्या देशात नसतील, तर वाहनांमध्ये ‘फ्लेक्स फ्ल्यूएल’चाही पर्याय असेल. सध्या ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत ‘फ्लेक्स-फ्लूएल इंजिन’ची निर्मिती होते. त्यामुळे वाहनचालकांना पेट्रोल किंवा इथेनॉल इंधन म्हणून वापरता येते.
‘फ्लेक्स-फ्ल्यूएल इंजिन’मुळे लोकांना इंधन म्हणून 100 टक्के कच्चे तेल वापरता येईल. त्यामुळे सरकार लवकरच उद्योग क्षेत्राला ‘फ्लेक्स-फ्ल्यूएल इंजिन’ निर्मिती करण्याचा आदेश देणार आहे. त्यानंतर देशातील वाहननिर्मिती उद्योगासाठी ‘फ्लेक्स-फ्ल्यूएल इंजिन’ अनिवार्य होणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.