SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मराठा आरक्षणासाठी पुन्हा कोर्टात धाव..! सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, पाहा त्यात काय मागणी केलीय..?

सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिका दाखल केलीय. त्यात आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेला आव्हान देतानाच, मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचाही पुनर्विचार करण्याची मागणी पाटील यांनी याचिकेत केली आहे.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेले 16 टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी अवैध ठरविले होते. त्यानंतर केंद्र सरकारने 102व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. मात्र, त्यात आरक्षणासाठी नवा प्रवर्ग तयार करण्याचे अधिकार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला आहेत, की राज्यांनाही, एवढाच मुद्दा होता.

Advertisement

मराठा आरक्षणाच्या मूळ प्रश्नांवर कोणीही पुनर्विचार याचिका दाखल केली नव्हती. आता विनोद पाटील यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल केलीय. विशेष म्हणजे, आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेलाही विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिकेतून आव्हान दिले आहे.

तसेच, महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या आधारे जो कायदा केला होता, त्याचाही पुनर्विचार करण्याची मागणी पाटील याचिकेद्वारे केली आहे.

Advertisement

मराठा समाजाची लोकसंख्या जास्त असतानाही, त्यांना शिक्षण, नोकरीत त्या प्रमाणात जागा मिळत नाहीत. आरक्षणाचे ठरविलेले जे प्रमाण आहे, त्यात मराठा समाजावर अन्याय होत असल्याची आकडेवारी पाटील यांनी याचिकेत नमूद केली आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्यापूर्वीच विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने कोर्ट त्याची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement